मुंबई - राज्यात डेंग्यूचे वाढते प्रमाण पाहता या आजाराचा फैलाव रोखण्यासाठी नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती होणे आवश्यक आहे. डेंग्यूबाबत इतर उपायांबरोबरच सोशल मीडियाचाही जनजागृतीसाठी वापर करण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिले. डेंग्यू रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा शुक्रवारी त्यांनी बैठकीत घेतला.
डेंग्यूबाबत रेडिओ जिंगल्स, रिक्षा-टॅक्सी, प्रसारफेरी याद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. मुंबईत २२७ फवारणी यंत्रांद्वारे डास प्रतिबंधक धूरफवारणी केली जात आहे. एखाद्या घरात डेंग्यूचा रुग्ण आढळल्यास त्या परिसरातील ५०० घरांची तपासणी करण्यात येत आहे. तसेच ९०० वर्कर्स डेंग्यूच्या अळ्या शोधण्यासाठी तपासणीचे काम करत आहेत. त्यांच्याद्वारे दररोज ५० ते ६० घरे या प्रमाणात साडेदहा लाख घरे तपासली जाणार आहेत, अशी माहिती सादरीकरणाद्वारे देण्यात आली. डेंग्यूचा फैलाव होऊ नये यासाठी काय खबरदारी घ्यावी हे लोकांना समजावून त्याविषयी जनजागृती होणे महत्त्वाचे आहे. या कामात राज्यातील काही महत्त्वाच्या सेलिब्रिटींना सहभागी करून घेण्यात यावे. १४ नोव्हेंबरपासून सुरू होणा-या स्वच्छता अभियानामध्ये डेंग्यू प्रतिबंधक अभियानाचाही समावेश करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिले.
७२ रुग्णांचा मृत्यू
मुंबई पालिकेच्या विविध रुग्णालयांत डेंग्यूची लागण झालेल्या ७५० रुग्णांची नोंद आहे. त्यातील नऊ रुग्णांचा मृत्यू ओढावला आहे. त्यामध्ये केईएम हॉस्पिटलमधील एका महिला डॉक्टरचाही समावेश आहे. पालिकेच्या केईएम रुग्णालयातील आठ डॉक्टरांना डेंग्यूची लागण झाल्याने पालिकेच्या कारभाराचे वाभाडे निघाले आहेत. दरम्यान, राज्यात या आजारामुळे सरकारी रुग्णालयांत आजवर ७२ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जाते.
आमदारांना ताप
काँग्रेसचे वडाळा मतदारसंघाचे आमदार कालिदास कोळंबकर यांना डेंग्यूची लागण झाल्याची माहिती आहे. त्यामुळे गुरुवारी झालेल्या काँग्रेसच्या विधिमंडळ नेत्याच्या निवडीच्या बैठकीस कोळंबकर गैरहजर राहिले होते. या शिवाय बॉलीवूडमधील अभिनेते, सेलिब्रिटींनाही डेंग्यू झाला. ऋषी कपूर यांना डेंग्यू, मलेरिया झाल्याने रुग्णालयात उपचार घ्यावे लागले होते.
या प्रकारांमुळे या मंडळींनी त्याचा चांगलाच धसका घेतला आहे.