आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uttam Khobragade News In Marathi, RPI, Dalit Politics, Shiv Sena

सातारा मतदार संघ देऊन शिवसेनेने दलितांना मूर्खात काढले - उत्तम खोब्रागडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘सातारा हा खुल्या वर्गासाठी असलेला लोकसभा मतदारसंघ रिपाइंच्या माथी मारत शिवसेनेने दलितांना मूर्खात काढले आहे’, अशी प्रतिक्रिया माजी सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे यांनी सोमवारी व्यक्त केली. रामटेक (जि. नागपूर) मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


‘महायुतीच्या जागावाटपात ‘रिपाइं’ला लोकसभेच्या तीन आणि राज्यसभेची एक जागा मिळणार होती. त्यामध्ये रामटेक, लातूर आणि सातारा या जागांचा समावेश होता. त्यामुळे रामटेकमधून ‘रिपाइं’च्या तिकीटवर निवडणूक लढवण्याची मी तयारी केली होती. परंतु, शिवसेनेने एकाच जागेवर ‘रिपाइं’ची बोळवण केली’, असा आरोप त्यांनी केला. सातारा मतदारसंघ खुल्या वर्गासाठी आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांचा हा बालेकिल्ला आहे. येथे ‘रिपाइं’ला विजय सोडाच, साधा उमेदवार मिळणेदेखील कठीण आहे. अशी पडेल जागा देऊन शिवसेनेने आठवले यांना वेड्यात काढल्याचे खोब्रागडे यांचे म्हणणे आहे.


बसपाने मला उमेदवारी दिली तर ठीक अन्यथा मी रामटेक मतदारसंघातून अपक्ष लढणार आहे. कार्यकर्त्यांचा तसा आग्रह असून एससी मतदारांचे प्राबल्य असल्याने मला विजयाची खात्री असल्याचेही खोब्रागडे यांनी सांगितले.


खोब्रागडे कोण आहेत?
उत्तम खोब्रागडे 1984 च्या बॅचचे आयएएस आहेत. बहुजन कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष असून समता शिक्षक परिषदेचे सल्लागारही आहेत. अमेरिकन दूतावासात राजनैतिक अधिकारी म्हणून काम केलेल्या देवयानी खोब्रागडे यांचे ते वडील होत. मोलकरणीच्या छळप्रकरणी देवयानीसह खोब्रागडे हेही चर्चेत आले. तेव्हापासूनच ते निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. आदर्श सोसायटीत सदनिका असल्याचा त्यांच्यावर ठपका आहे.