आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Utter Pradesh News In Marathi, Politics, Government

दोन मराठी माणसे चालवणार उत्तर प्रदेश राज्याचा कारभार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- गरिबी, बेकारी, गुन्हेगारी, शिक्षणाचा अभाव यामुळे विकासात मागे पडलेल्या उत्तर प्रदेशाला प्रगतिपथावर नेण्यासाठी आता महाराष्ट्राच्या दोन मराठी माणसांचा हातभार लागणार आहे. यापैकी एक आहेत उत्तर प्रदेशचे मुख्य न्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि दुसरे आहेत नूतन राज्यपाल राम नाईक. उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात मंगळवारी नाईक यांनी राज्यपालपदाची सूत्रे हाती घेतली, तर चंद्रचूड 31 ऑक्टोबर 2013 पासून अलाहाबाद उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहत आहेत. त्यांनीच नाईक यांना राज्यपालपदाची शपथ दिली.
राज्यपाल राम नाईक
जनसंघ संघटक ते आमदार, खासदार आणि मंत्रिपद असा 60 वर्षे अथक अन् यशस्वी प्रवास राम नाईक यांनी केला आहे. यापुढे माझ्या हातून खूप काही चांगले काम करता येईल, असा विश्वास त्यांनी राज्यपालपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर व्यक्त केला. ते म्हणाले, शिक्षण व बेरोजगारी या दोन विषयांवर पायाभूतपणे काही उभारता येईल का, याचा मी विचार करत आहे. राज्यपालांचे अधिकार व राज्य सरकार यांच्यात समन्वय ठेवून मी हे काम करू शकतो आणि मला नक्की विश्वास आहे की मुख्यमंत्री अखिलेश यादव मला नक्की साथ देतील. गेल्या आठवड्यात नाईक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीत मोदींनी त्यांना नव्या इनिंगसाठी शुभेच्छा दिल्या. ‘दिव्य मराठी’ला दिलेल्या खास मुलाखतीत नाईक यांनी ‘मी राज्यपाल भवन व राज्य सरकार यांच्यात समन्वयाचा सेतू बांधेन,’ असे अधोरेखित केले होते. तोच मुद्दा त्यांनी राज्यपालपदाची सूत्रे हाती घेताना मांडला.

शांततेने मार्ग काढण्याचे वैशिष्ट्य : नाईक यांचा आतापर्यंतचा सामाजिक व राजकीय प्रवास पाहता एखाद्या प्रश्नावर शांततेने मार्ग काढण्यावरच त्यांचा भर राहिला आहे. त्यांचे हे वैशिष्ट्य उत्तर प्रदेशसारख्या मागे राहिलेल्या राज्याला बाहेर काढण्यासाठी मदत करेल, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

मुख्य न्या. धनंजय चंद्रचूड
उत्तर प्रदेशच्या मुख्य न्यायाधीशाची जबाबदारी सांभाळणार्‍या धनंजय चंद्रचूड यांनी 14 वर्षांपूर्वी मुंबई उच्च् न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून सूत्रे हाती घेतली होती. दिल्ली, हार्वर्ड विद्यापीठात त्यांनी कायद्याचा अभ्यास केला असून डॉक्टरेटही मिळवली आहे. महिला कामगार, एचआयव्हीग्रस्त कामगार यांच्या हक्कांविषयी त्यांनी दिलेले निर्णय खूप महत्त्वाचे ठरले आहेत. धनंजय यांचे वडील यशवंत चंद्रचूड यांनी 7 वर्षे 4 महिने सर्वाधिक काळ सरन्यायाधीशपद भूषवले होते. ‘किस्सा कुर्सी का’ प्रकरणात त्यांनी संजय गांधी यांना तुरुंगात पाठवले होते. दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या निर्णयामुळे खूप नाराज झाल्या. मात्र निवृत्तीनंतर केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या पदावर स्थान मिळेल, असा मोह ठेवून चंद्रचूड यांनी कधीच एकतर्फी निर्णय दिले नाही. सत्ताधार्‍यांच्या विरोधात निकाल दिल्याचा राग ठेवून काँग्रेसनेही त्यांना निवृत्तीनंतर कुठलेही पद दिले नाही.