आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Vadodara\'s Gaekwad Royal Family Information In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या मराठी राजाच्या 25 हजार कोटींच्या संपत्तीवरून वारशांत झाला होता वाद!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बडोदे संस्थानाचे पुरोगामी वृत्तीचे, कर्तृत्ववान संस्थानिक महाराज श्रीमंत तिसरे सयाजीराव गायकवाड यांची आज पुण्यतिथी. 6 फेब्रुवारी 1939 रोजी गायकवाड यांचे निधन झाले. मात्र, आपल्या मृत्यूपूर्वी त्यांनी देशातील सर्वात श्रीमंत संस्थानांपैकी बडोदा हे संस्थान बनविले. नाशिक जिल्ह्यातील कवळाणे येथे 1863 मध्ये जन्म घेतलेल्या या राजाचे मूळ नाव होते गोपाळराव काशीराव गायकवाड. पित्याच्या आकस्मिक निधनानंतर केवळ वयाच्या 18 व्या वर्षी सयाजीरावांना बडोदा संस्थानाच्या गादीवर बसावे लागले. दिवाण सर टी. माधवराव यांनी त्यांना राज्यकारभाराचे धडे दिले. लहान वयातच बडोदा संस्थानाची जबाबदारी येऊन पडल्याने नव्या नव्या गोष्टी समजून घेणे व आत्मसात करणे याची त्यांना सवय लागली. पुढे या सवयीचा फायदा त्यांना आयुष्यभर झाला. सयाजीरावांनी आपल्या कर्तृत्त्वाने हैदराबादच्या नवाबानंतरचे देशातील सर्वाधिक श्रीमंत संस्थान म्हणून बडोद्याचा नावलौकिक वाढवला. आज सयाजीरावांची पुण्यतिथी त्यानिमित्ताने या मराठी महाराजाने केलेल्या कामांवर व कर्तृत्त्वावर एक नजर फिरवूया...

लहान वयातच संस्थानाची येऊन पडली जबाबदारी- पित्याच्या निधनानंतर सयाजीरावांकडे वयाच्या केवळ 18 व्या वर्षी संस्थानाची जबाबदारी आली. दिवाण सर टी. माधवराव यांनी सयाजीरावांना राज्यकारभाराचे शिक्षण दिले. 1881 मध्ये गादीवर बसल्यानंतर त्यांनी आर्थिक दृष्ट्या राज्याची स्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना करण्यास सुरुवात केली. प्रशासकीय जबाबदारीची विभागणी हे तत्त्व राज्यकारभारात लागू करून राज्ययंत्रणेत सुरळीतपणा निर्माण केला. सल्लागार नेमून कल्याणकारी योजना अंमलात आणल्या. न्यायव्यवस्थेत सुधारणा केल्या. ग्रामपंचायतींचे पुनरुज्जीवन केले. तसेच सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची योजना सुरू करून अल्पावधीतच ती सर्व राज्यभर लागू केली. गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या देऊन उच्च शिक्षणाची सोय केली. औद्योगिक कलाशिक्षणाकरिता ‘कलाभूवन’ ही संस्था स्थापन केली. ‘प्राच्य विद्यामंदिर’ या संस्थेच्या वतीने प्राचीन संस्कृत ग्रंथांचे संशोधन व प्रकाशन करण्यास उत्तेजन दिले. ‘श्रीसयाजी साहित्यमाला’ व ‘श्रीसयाजी बाल ज्ञानमाला’ या दोन मालांमधून उत्तम ग्रंथांची भाषांतरे प्रसिद्ध केली. संस्थानात गावोगावी वाचनालये स्थापन केली. फिरत्या वाचनालयांचीही सोय केली.
बाबासाहेबांसारख्या रत्नाला याच राजाने लंडनला पाठवले- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 1920 च्या दशकात याच राजाने लंडनमध्ये शिकायला पाठवले. याबरोबरच अंत्यत पुरोगामी निर्णय घेतले. सामाजिक क्षेत्रात त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. पडदापद्धतिबंदी, बालविवाहबंदी, मिश्रविवाह, स्त्रियांचा वारसा, कन्याविक्रयबंदी, अस्पृश्यतानिवारण, विधवाविवाह आदी सुधारणा त्यांनी प्रत्यक्ष अंमलात आणल्या. घटस्फोटासंबंधीचा कायदा सर्व भारतात पहिल्यांदाच त्यांनी जारी केला. हरिजनांसाठी अठरा शाळा काढल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली आणि त्यांची संस्थानात उच्च पदावर नेमणूकही केली. सुधारणांच्या प्रत्यक्ष पुरस्कारामुळे त्यांना ‘राष्ट्रीय सामाजिक परिषदे’च्या अध्यक्षपदाचा मान मिळाला.
हिंदुस्थानातील शेवटचा आदर्श राजा- सयाजीराव गायकवाड यांना प्रवासाची आवड होती. त्यामुळे त्यांनी जगभर प्रवास केला. जेथे जेथे जे जे चांगले असेल, ते ते चोखंदळपणे स्वीकारून आपल्या संस्थानाची सर्वांगीण भरभराट करण्याचा त्यांनी सतत प्रयत्न केला. बडोदे ही कलापूर्ण प्रेक्षणीय नगरी ठरली, याचे कारण त्यांनी बांधलेल्या सुंदर वास्तू. लक्ष्मीविलास राजवाडा, वस्तुसंग्रहालय, कलावीथी, श्री सयाजी रुग्णालय, नजरबाग राजवाडा, महाविद्यालयाची इमारत वगैरे वास्तूंनी बडोद्याची शोभा वाढविली आहे. लंडनला भरलेल्या पहिल्या दोन गोलमेज परिषदांनाही ते हजर होते. लोकमान्य टिळक, बाबू अरविंद घोष या थोर नेत्यांशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता. राष्ट्रीय आंदोलनाला त्यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा होता. ज्ञानवृद्धी, समाजसुधारणा व शिस्तबद्ध प्रशासन या सर्वच बाबतींत ते यशस्वी ठरले. ‘हिंदुस्थानातील शेवटचा आदर्श राजा’ या शब्दांत त्यांचे यथोचित वर्णन पंडित मदनमोहन मालवीय यांनी त्यामुळेच केले आहे.
पुढे वाचा, या मराठी महाराजाच्या वारसांत 25 हजार कोटींच्या संपत्तीवर झाला वाद...