मुंबई- महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ माजवून देणारी घटना मुंबईतील वाकोला पोलिस ठाण्यात घडल्यानंतर या घटनेचे सत्य नेमके काय आहे हे अद्याप पुढे आले नाही. वाकोला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास जोशी आणि एपीआय शिंदे हे दिलीप शिर्के यांना मानसिक त्रास द्यायचे असा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केल्यानंतर या घटनेचा घटनाक्रम उघड होण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेच्या आदल्या दिवशी रात्रपाळीत शिर्के यांनी
आपण कामावर हजर असतानाही गैरहजर का दाखवले यावरून जोशी-शिर्के यांच्यात वाद झाला होता. मात्र आता सहायक फौजदार दिलीप शिर्के यांच्या मोबाईलचे रेकॉर्ड गोळीबारामधील सत्य समोर आणेल असे तपास अधिका-यांनी म्हटले आहे. आपण ड्युटीवर असल्याचे शिर्के यांनी कॉल करून कळविले होते. हा कॉल नेमका कुठून आला? जोशी यांच्याशी वाद झाल्यानंतर 15 मिनिटांत शिर्केंनी गोळ्या झाडल्या. यादरम्यान ते कोणाशी बोलले का? या सर्व प्रश्नांची उत्तरे कॉल रेकॉर्ड आणि टॉवर लोकेशन तपासल्यावर समोर येतील असे क्राइम ब्रॅन्चच्या अधिका-यांनी म्हटले आहे.
बंदोबस्त पॉईंटवर न दिसल्याने एपीआय शिंदे यांनी दिलीप शिर्के गैरहजर असल्याची नोंद डायरीत केली. मात्र हे शिर्के यांना समजल्यावर त्यांनी पोलीस ठाण्यात कॉल करून आपण ऑन ड्युटी असल्याचे सांगितले. डायरीत गैरहजेरी मांडल्याचे शिर्के यांना कुणी सांगितले. त्याप्रमाणे शिर्के यांनी कुठून कॉल केला? ते नक्की पॉईंटवर होते का? या प्रश्नांची उत्तरे टॉवर लोकेशनवरून मिळणार आहेत. त्यामुळे मुंबई पोलिस दलाने घटनेनंतर केलेला खुलासा व शिर्केंसह त्यांच्या कुटुंबियांनी केलेले आरोप, दावे यातून सत्य पुढे येईल.
पूर्वीच्या अधिका-यांचे जबाब घेणार- दिलीप शिर्के यांचा मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप त्यांचा मुलगा आणि पत्नीने केला आहे. त्याचीही तपासणीदरम्यान दखल घेतली जाईल. याचबरोबर शिर्के यांनी या ठाण्यात कार्यरत असलेल्या तत्कालीन वरिष्ठांची तक्रार केली होती. शिर्के यांनी तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक परदेशी, विनायक मुळ्ये यांच्या वरिष्ठ अधिकार्यांकडे तक्रारी देखील केल्या होत्या. त्यामुळे या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचे देखील जबाब नोंदविण्यात येणार आहेत.
दिलीप शिर्के यांनी पोटात गोळी झाडल्यानंतर जखमी झालेले विलास जोशी लिलावती रुग्णालयात नेईपर्यंत शुद्धीत होते आणि बोलतही होते. मृत्यूच्या दारात असलेल्या जोशी यांनी पोलीस ठाणे ते रुग्णालयापर्यंतच्या प्रवासात घडलेला प्रकार सांगितला. शिर्के यांनी का वाद घातला आणि पुढे काय झाले ही सर्व ह
किकत त्यांनी सांगितली. जोशी यांचा हा मृत्यूपूर्व जबाब तपासासाठी घेतला जाणार असल्याचेही तपास अधिका-यांनी म्हटले आहे. या घटनेप्रकरणी क्राईम ब्रॅन्चच्या अधिका-यांनी आतापर्यंत 15 जणांचे जबाब नोंदविले आहेत. यात मृत जोशी आणि शिर्के यांच्या कुटुंबियांचा समावेश आहे.