आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Varkari Will Arrang Rally Against Anti Magic Ordinance

जादूटोणा प्रतिबंधक अध्यादेशाविरूध्‍द वारक-यांचा निघणार मोर्चा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘राज्य शासनाच्या जादूटोणा प्रतिबंधक अध्यादेशातील काही गंभीर त्रुटींमुळे संत-महंतांच्या भारतीय संस्कृतीविषयक शिकवणीला तडा जात आहे. या त्रुटी दूर कराव्यात, या मागणीसाठी मंगळवारी आझाद मैदानावर मोर्चा निघणार आहे. मात्र काही नास्तिक मंडळी चुकीच्या बातम्या पसरवून समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. काहीही झाले तरी हा मोर्चा होणारच,’ असा दावा वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ धर्माचार्य व भारतीय संस्कृती रक्षक समितीचे कार्याध्यक्ष रामेश्वर महाराज शास्त्री यांनी रविवारी केला.
मोर्चासाठी शंभरहून अधिक प्रमुख वारकरी मंडळांचे प्रमुख मुंबईत दाखल झाले आहेत. राज्यभरातून हजारो वारकरी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत, त्यामुळे मोर्चा यशस्वी होईलच, असा दावाही शास्त्री यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केला आहे.
रविवारी मुंबईतील वारकरी भवन येथे एका बैठकीत तयारीचा आढावा घेण्यात आला. राज्य वारकरी महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश महाराज जवंजाळ, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले, वारकरी प्रबोधन मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर, राष्‍ट्रीय वारकरी सेनेचे कोकण प्रांताध्यक्ष बापू महाराज रावकर, वारकरी प्रबोधन महासमितीचे संस्थापक अध्यक्ष रामेश्वर महाराजांच्या उपस्थितीत मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला.
शास्त्री म्हणाले की, राज्यभरातील मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने काही मंडळी नास्तिक मंडळींशी हातमिळवणी करून चुकीच्या बातम्या पसरवून समाजाची दिशाभूल करत आहेत. प्रत्यक्षात या लोकांच्या मागे बोटावर मोजण्याइतकेही लोक नाहीत. दोषी व्यक्तीला शासन झालेच पाहिजे, मात्र निर्दोष व्यक्तीला शासन होता कामा नये. शासनाचा अध्यादेश राज्यघटनेच्या दृष्टीने अव्यवस्थित आहे. त्यात अनेक त्रुटी आहेत. या कायद्याचा गैरवापर होऊ शकतो. आमचा कायद्याला विरोध नाही तर त्यातील त्रुटींना असल्याचे शास्त्री यांनी स्पष्ट केले.
विधेयकात हिंदूविरोधी एकही कलम नाही ,मोर्चात सहभागी न होण्याचे वारकरी मंडळांचे आवाहन
‘जादूटोणाविरोधी वटहुकुमात आता वारकरी हिंदूंच्या परंपरेला बाधा होईल, असे एकही कलम नाही. उलट ज्या अघोरी कृत्यांच्या विरोधात संत, वारक-यांनी जनजागृती केली त्याच कृत्यांना या कायद्याने आळा बसणार आहे. हे विधेयक मंजूर होणार, हा वारकरी, संतांच्या विचारांचा विजय आहे,’ अशी भूमिका घेत काही प्रमुख वारकरी मंडळींनी मंगळवारच्या मोर्चात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. पंढरपूरमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या वेळी समस्त दिंडीकरी फडकरी समाज संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळगावकर व अन्य उपस्थित होते.
माजी अध्यक्ष माधव महाराज शिवणीकर, देहूकर फडाचे प्रमुख आणि तुकाराम महाराजांचे वंशज बापूसाहेब महाराज देहूकर, वासकर फडाचे प्रमुख निवृत्त न्यायाधीश विठ्ठल महाराज वासकर, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख भानुदास महाराज ढवळीकर, अखिल विश्व वारकरी सेनेचे अध्यक्ष अरुण महाराज बुरघाटे, ठाकूरबुवा फडाचे अध्यक्ष गोपाळबुवा ठाकूर, वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील आदी या वेळी उपस्थित होते.
सर्वच संतांनी बुवाबाजीच्या विरोधात जनजागरण केले आहे. त्यामुळे काही भोंदू बाबांनी आयोजित केलेल्या या मोर्चापासून सर्व वारक-यांनी दूर राहावे, असे आवाहन या मंडळींनी केले आहे.
डिसेंबरमध्ये बैठक
जादूटोणाविरोधी वटहुकुमाबाबत वारक-यांच्या काही शंका असल्यास त्याबाबत चर्चा करण्याची तयारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दाखवली आहे. हिवाळी अधिवेशनात विधेयकावर चर्चा होईल.त्यात दुरुस्तीची तयारीही सरकारने दाखवली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्यानंतर डिसेंबरमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत वारक-यांची बैठक घेण्यात येईल, असे विठ्ठल पाटील यांनी सांगितले.