आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vasantrao Naik Gave Stability To State, Say President Pranav Mukharjee

वसंतराव नाईकांकडून राज्याला स्थैर्य , राष्‍ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे गौरवोद्गार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राला राजकीय, आर्थिक स्थैर्य दिले. दुष्काळासारख्या संकटाचे आव्हान निकराने परतवून लावले. राज्याला प्रगती, स्थैर्य आणि समृद्धी दिली. त्यांनी केवळ राज्याच्याच नव्हे, तर देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले, असे गौरवोद्गार राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सोमवारी काढले.


राज्य सरकारच्या वतीने हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री नाईक यांचा जन्मशताब्दी सोहळा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या डॉ. होमी भाभा सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मुखर्जी यांनी नाईक यांच्या उत्तुंग कारकीर्दीचा आढावा घेतला.


या कार्यक्रमास राज्यपाल के. शंकरनारायणन, केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री प्रफुल्ल पटेल, केंद्रीय कृषी राज्यमंत्री तारिक अन्वर, विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख, विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, नाईक यांचे पुतणे व अन्न-औषध पुरवठामंत्री मनोहर नाईक व्यासपीठावर उपस्थित होते.


मुखर्जी म्हणाले की, ग्रामीण भागातील लोकांच्या प्रश्नांची नाईक यांना असलेली जाण व तळागाळातील जनतेला पतपुरवठा करण्यासंदर्भातील त्यांच्या विचारांनी मी फारच प्रभावित झालो होतो. देशातील बँकांचे सार्वजनिकीकरण होऊनही आणि सहकाराचे जाळे वाढूनही बहुतांश ग्रामीण भाग पतपुरवठ्यापासून वंचित होता. तो वाढवण्यासाठी नाईक यांनी अतिशय मौल्यवान मार्गदर्शन केले होते.


तिस-या आणि चौथ्या पंचवार्षिक योजनेदरम्यान राबवण्यात आलेल्या दोन वार्षिक योजनांच्या नियोजनाचे कामही त्यांनी लीलया पेलले होते. केंद्राने राज्यांना कशा प्रकारे आर्थिक मदत करावी, यासाठीही त्यांनी महत्त्वपूर्ण उपाययोजना सुचवल्या. नाईक यांच्या महत्त्वाच्या भाषणांचे इंग्रजीतूनही भाषांतर व्हावे, जेणेकरून इतरही लोक त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊ शकतील, अशी सूचनाही त्यांनी केली. टपाल खात्याने नाईक यांच्यावर काढलेल्या विशेष कव्हरचेही याच कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.


सोहळ्यासाठी 100 कोटी, जन्मगावी स्मारक : मुख्यमंत्री
नाईक यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. परभणी कृषी विद्यापीठाला नाईक यांचे नाव देण्याची, त्यांचे जन्मगाव असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील गहुलीत 2 कोटी रुपये खर्चून, तर पुसदमध्ये 10 कोटी रुपयांचे स्मारक बांधण्याची योजना आहे. नाईक यांचे शिक्षण झालेल्या नागपूरच्या मॉरिस कॉलेजात 1750 आसन क्षमतेचे प्रेक्षागृह बांधण्याची आणि केंद्राच्या मदतीने नागपूर येथे राष्ट्रीय कृषी प्रदर्शन केंद्र भरवण्याची घोषणा चव्हाण यांनी केली.


‘जाहीर फाशी द्या’ म्हणणारा नेता विरळच : शरद पवार
केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार म्हणाले, आपण 41 वर्षांपूर्वी नाईक यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री होतो. मुख्यमंत्र्यांकडे असतात ती सामान्य प्रशासन आणि गृह खाती त्यांनी माझ्याकडे सोपवली होती. दोन वर्षांनी मंत्रिमंडळात बदल करताना त्यांनी आपल्याला बोलावून तुझ्याकडचा दंडुका काढून पाटी-पेन्सिल देणार असल्याचे सांगत शिक्षण खाते सोपवले होते. त्या वेळी ‘दोन वर्षांत अन्नधान्यात राज्य स्वयंपूर्ण झाले नाही तर मला जाहीर फाशी द्या,’ अशी घोषणा करत त्यांनी धान्याचा दुष्काळ संपवला होता, अशी आठवण पवार यांनी सांगितली.


दूध व पाकीट आजही विसरू शकत नाही : सुशीलकुमार शिंदे
‘माझ्या पहिल्या निवडणुकीत प्रचारासाठी नाईक स्वत: आले होते. त्या वेळी त्यांनी करमाळ्याच्या जनतेला ‘तुम्ही यांना आमदार करा, मी त्यांना नामदार करतो,’ असे आश्वासन दिले होते व ते पूर्णदेखील केले होते. तसेच मला तिकीट जाहीर झाल्यानंतर मी त्यांना ‘वर्षा’वर भेटण्यासाठी गेलो होतो. त्या वेळी अगदी रात्री उशिरादेखील मला त्यांनी भेट दिली. त्या वेळी त्यांनी दिलेले दूध व पाकीट मी आजही विसरू शकत नाही. नाईक यांच्या आशीर्वादाच्या बळावरच मी आज देशाचा गृहमंत्री झालो,’ अशा शब्दांत सुशीलकुमार शिंदे यांनी नाईक यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.