आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Verbally Attack On Chief Minister Devendra Fadnavis

भाजपमध्ये खदखद: कोअर कमिटीत आमदारांनी मुख्यमंत्र्यांनाच सुनावले!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - निधी असो, योजना असो किंवा मंत्रिमंडळ विस्तार यात विदर्भालाच झुकते माप मिळत असल्याबद्दल भाजप आमदारांनी थेट मुख्यमंत्र्यांना धारेवर धरले. बुधवारी रात्री भाजप आमदारांसमेत झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांवर असा शाब्दिक हल्ला झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या ३ डिसेंबर रोजी करण्यात येईल, असा शब्द देऊन आमदारांना शांत करण्यात आले.

महत्त्वाची मंत्रिपदे विदर्भाच्या वाट्यालाच जात असल्याने दुखावलेल्या आमदारांनी समतोल विकास न साधला गेल्यास त्याचा पक्षाला फटका बसू शकतो, असे मुख्यमंत्र्यांना सुनावल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपचे मंत्रिपदासाठी इच्छुक आमदार मुख्यमंत्री तसेच दिल्लीत लॉबिंग करत आहेत. यात विदर्भातील आमदारांची संख्या जास्त आहे. विस्तारात भाजपला पाच मंत्रिपदे मिळणार असून शिवसेना दोन तसेच घटक पक्षांना ३ मंत्रिपदे दिली जाणार आहेत. भाजपच्या कोट्यातील पाचपैकी तीन मंत्रिपदे ही विदर्भाकडे जाणार असल्याने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांनी नाराजी व्यक्त केली. पांडुरंग फुंडकर, चैनसुख संचेती या विदर्भातील नेत्यांची नावे निश्चित झाल्याचे मानले जाते. नाशिकमधून देवयानी फरांदे यांची वर्णी लागू शकते. मुंबईतून आशिष शेलार किंवा मंगलप्रभात लोढा यापैकी एक नाव निश्चित समजले जाते. त्यावर बैठकीत १४ जणांनी उभे राहून मंत्रिपदासाठी दावा केला. यात मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रातील आमदार जास्त होते.
निधी वाटपातही अन्याय
वर्णी लागत नसल्याने नाराज मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांनी आपला मोर्चा मग निधी व योजनांकडे वळवला. विदर्भाचा अनुशेष भरताना इतर भागांवरही अन्याय होता कामा नये, हे पाहिले पाहिजे. काँग्रेस, राष्ट्रवादीला नाकारून मतदारांनी राज्याच्या समतोल विकासासाठी भाजपला साथ दिली. मात्र विदर्भ वगळता इतर भागात कामे वेगाने होत नसतील तर वर्षभरात सात महापालिका तसेच दहा नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत, त्यात पक्षाला फटका बसू शकतो, असा इशाराही या नाराज आमदारांनी मुख्यमंत्र्यांना दिला.
शिवसेनेकडून पाटील, खोतकर निश्चित
शिवसेनेकडून गुलाबराव पाटील तसेच अर्जुन खोतकर यांची मंत्रिपदासाठी नावे निश्चित झालीत. तर महादेव जानकर (रासप), सदाभाऊ खोत (स्वाभिमानी संघटना) यांचा समावेश निश्चित मानला जातो. रामदास आठवलेंनी कुटुंबात मंत्रिपद नको असल्याचे जाहीर केले असले तरी पत्नीचेच नाव पुढे केल्याचे वृत्त आहे. विनायक मेटेंच्या नावाबाबत मात्र अजूनही अनिश्चितता आहे.
संभाजी निलंगेकर, खाडेंची नाराजी
अंतिम यादीत नाव होणार नसल्याचे समजल्याने संभाजी निलंगेकर , सुरेश खाडे, राज पुरोहित नाराज आहेत. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राचा विचार झाला पाहिजे, अशी आग्रही भूमिका घेतली. भाजपमध्ये आता ‘काँग्रेस संस्कृती’ आल्याने महत्त्वाचे निर्णय दिल्लीतून होतात, असा टोला भाजपच्या एका आमदाराने लगावला.