आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिट अँड रनप्रकरण : सलमानचा फैसला ६ मे रोजी, निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - प्रसिद्ध बाॅलीवूड अभिनेता सलमान खान याच्या ‘हिट अँड रन’ या प्रदीर्घ चाललेल्या खटल्यात दाेन्ही पक्षाचा युक्तिवाद नुकताच पूर्ण झाला अाहे. या प्रकरणाचा निकाल मुंबई सत्र न्यायालय ६ मे रोजी दुपारी सव्वाअकरा वाजता देईल, असे न्या. डी. डब्ल्यू. देशपांडे यांनी मंगळवारी जाहीर केले.

सलमान खान याच्या लँड क्रूझ गाडीने २८ सप्टेंबर २००२ च्या मध्यरात्री पश्चिम मुंबईतील वांद्रे येथील हिल रोडच्या फुटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले होते. त्यात एकाचा मृत्यू तर चार जण गंभीर झाले होते. तेव्हा त्याच्यावर आयपीसी २७९, ३३७, ३३८ आणि ४२७ या किरकोळ कलमाखाली गुन्हा नोंद झाला होता. नंतर २०१३ मध्ये ३०४ (२) या कलमाखाली सलमानवर नव्याने सदोष मनुष्यवधाचा आरोप ठेवण्यात आला. तेव्हापासून हा खटला मुंबई सत्र न्यायालयात फास्ट ट्रॅकवर चालू आहे. या खटल्यात एकूण २७ साक्षीदार तपासण्यात आले.

सलमानचा अपघात नेमका कसा झाला? याची ट्रायल वांद्रे पोलिसांनी शनिवारी रात्री घेतली. त्याचे वार्तांकन मुंबईतील दोन इंग्रजी वर्तमानपत्रांनी केले होते. न्यायालयाने संबंधितांना सोमवारी नोटिसा पाठवल्या होत्या. पोलिस व संपादक न्यायालयासमोर हजर झाले हाेते. खटला संपत आलेला असताना ट्रायल कशासाठी ? अशी न्यायाधीशांनी पोलिसांना विचारणा केली. पुन्हा अशी चूक करू नका अशी ताकीद संपादकांनाही न्यायाधीशांनी दिली.

अभ्यासाला १५ दिवस
या खटल्याच्या अभ्यासाला किमान पंधरा दिवस तरी लागतील असे सांगत निकालासाठी ६ मे रोजीची तारीख न्या. डी. डब्ल्यू. देशपांडे यांनी सरकारी अाणि बचाव पक्षाच्या सहमतीने निश्चित केली.

माध्यमांना समज
६ मे रोजी या खटल्याचा निकाल जाहीर केला जाईल. खटल्याचा निकाल प्रभावीत होईल असे काही माध्यमांनी छापू नये. तसेच या खटल्याशी संबंधितांच्या मुलाखती निकाल जाहीर होईर्यंत छापू नयेत, अशी समजही माध्यमांना दिली.

१० वर्षे शिक्षेची तरतूद
भारतीय दंड संहितेच्या ३०४ (२) या कलमाखाली सलमानवर सदोष मनुष्यवधाचा आरोप ठेवण्यात अाला आहे. यामध्ये जर ताे दोषी असल्याचे सिद्ध झाल्यास १० वर्षे शिक्षेची तरतूद आहे.