आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Very Cyber Police Suqad Come Into Existance, Headquarter In Mumbai

राज्यात सायबर पोलिस दलाची लवकरच स्थापना, मुंबईत मुख्यालय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - माहिती-तंत्रज्ञान क्षेत्र प्रगत होत व विस्तारत असताना मोठ्या प्रमाणात सायबर गुन्ह्यांची संख्याही वाढू लागली आहे. या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी व अशा गुन्ह्यांची उकल करण्यासाठी राज्यात लवकरच स्वतंत्र सायबर पोलिस दल स्थापन केले जाणार आहे. यासाठी स्वतंत्र उपायुक्तपद निर्माण करण्यात येणार असून येत्या तीन महिन्यांत हे दल कार्यरत होईल, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांनी दिव्य मराठीशी बोलताना दिली.

सध्या राज्याचे गृहखाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असून त्यांनी गृह विभागात आमूलाग्र बदल करण्याच्या योजनेचा एक भाग म्हणून सायबर पोलिस दल स्थापन करण्यावर जोर दिला आहे. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी सायबर गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. सायबर गुन्हे उघडकीस आणणे कठीण असल्याने अनेक गुन्ह्यांची उकल होऊ शकलेली नसल्याने मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्यात स्वतंत्र सायबर पोलिस दल आणि त्यासाठी उपायुक्तपद निर्माण व्हावे यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. सायबर पोलीस दलाचे अत्याधुनिक मुख्यालय मुंबईत उभारण्यात येणार आहे. मुख्यालयाकरिता माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आधुनिक उपकरणे पुरवण्यासाठी या क्षेत्रातील कंपन्यांकडून निविदा मागवल्या जाणार आहेत. तसेच या विभागासाठी नियुक्त करण्यात येणा-या पोलीस आणि अधिका-यांना साईट्स हॅकिंग रोखण्यापासून मोबाइल फिशिंगपर्यंतचे विशेष प्रशिक्षणही दिले जाणार आहे. सायबर पोलिस दलात काम करण्यास इच्छुक असणा-यांना इंग्रजी येणे बंधनकारक करण्यात येणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.

सायबर गुन्ह्यातील वाढ
२०१३ मध्ये संपूर्ण राज्यात ९३७ सायबर गुन्ह्यांची नोंद झाली होती तर २०१४ मध्ये ही संख्या २,६९६ पर्यंत गेली होती. जानेवारी २०१५ मध्ये ६६ (मागील वर्षी याच महिन्यात २२), फेब्रुवारी २०१५ मध्ये ११८ (मागील वर्षी याच महिन्यात ३७) आणि मार्चमध्ये १६७ (मागील वर्षी याच महिन्यात ५४) सायबर गुन्ह्यांची नोंद झाली आहे. तर दिवसोंदिवस यात वाढच होत असल्याचे पाहणीतून समोर आले आहे.

"सर्ट'चे कार्यालयही मुंबईत
सायबर हल्ल्यांपासून देशाला वाचवण्यासाठी कार्यरत असलेल्या 'कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम'चे (सर्ट) केंद्र मुंबईत स्थापन करण्यात येणार आहे. देशात सायबर हल्ले रोखण्यासाठी जानेवारी २००४ मध्ये "सर्ट'ची स्थापना करण्यात आली. व्हायरस, वर्म यांचे हल्ले रोखण्याबरोबरच वेबसाइट्स हॅकिंगच्या विरोधात 'सर्ट' काम करते. जानेवारी महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे 'सर्ट'चे केंद्र मुंबईत स्थापन करावे अशी मागणी केली होती. केंद्राने याला मंजुरी दिली आहे.