आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Very Few People Rich In Maratha Community, Said Narayan Rane

मराठा समाजातील मूठभर नेतेच श्रीमंत, नारायण राणे यांची माहिती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘मराठा समाजातील फक्त मूठभर नेतेच श्रीमंत असून अन्य गरीब आणि पिचलेले आहेत. त्यांनाही आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे. आरक्षणाबाबत सर्व्हे करण्याचे काम गुरुवारपासून सुरू झाले असून 28 फेब्रुवारीपर्यंत आपण राज्य सरकारला अहवाल देऊ,’ अशी माहिती मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष आणि राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी ‘दिव्य मराशी’शी बोलताना दिली.
मंत्रालयातील आपल्या दालनात बोलताना राणे यांनी सांगितले की, मराठा समाज सत्तेत असला, सहकारी संस्था चालवत असला तरी त्याचा समाजातील सर्वच लोकांना फायदा झालेला नाही. मी जेव्हा आरक्षणाचा अहवाल तयार करण्यासाठी बैठका घेत होतो तेव्हा मला याची जाणीव झाली. मला काही मराठा बेरोजगार तरुण भेटले. हातात पदवी असतानाही त्यांना नोकरी मिळत नव्हती. अनेक शेतकरी असे भेटले जे प्रचंड गरीब आहेत. काही मूठभर नेते मात्र प्रचंड श्रीमंत आहेत. एका नेत्याकडे शेकडो एकर जमीन असून त्यात गरीब मराठा शेतकरी नोकरी करीत आहे. त्यामुळे मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देणे आवश्यक आहे. त्याबाबतचा अहवाल तयार करण्याचे काम शेवटच्या टप्प्यात आले असून राज्यभरात सर्व्हे सुरू केलेला आहे. सर्व्हेचे काम झाल्यानंतर 28 फेब्रुवारीपर्यंत राज्य सरकारला आपण आपला अहवाल सादर करू.’
टोलमुक्ती अशक्यच, नवे नियम लवकरच येणार
राज्यात सुरू असलेल्या टोल आंदोलनाबाबत राणे म्हणाले, राज्य टोलमुक्त करताच येणार नाही. मात्र टोलचे नवे नियम आता लवकरच लागू केले जाणार असल्याने टोलप्रती असलेली नाराजी दूर होण्यास मदत मिळेल. पायाभूत सुविधा समितीची नुकतीच बैठक झाली. मी त्या समितीचा सदस्य आहे. जे नवीन प्रस्ताव आलेले आहेत त्यांचा पूर्ण अहवाल आम्ही मागवलेला आहे. काही कंत्राटदारांनी कंत्राटाची रक्कम 100 कोटी असताना 150 ते 200 कोटी रुपये केली आहे. रक्कम जास्त असल्याने टोल वसुलीही जास्त वर्षे करण्याची संधी मिळते. त्यामुळे या सर्व प्रस्तावांचा नव्याने विचार केला जात आहे. नवीन नियम जुन्या टोलनाक्यांना लागू होणार नाहीत मात्र ज्यांचा कालावधी संपलेला आहे ते टोल बंद केले जातील.