आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधान परिषद निवडणूक : काँग्रेस-राष्ट्रवादीत बंडखोरी युतीच्या पथ्यावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/सोलापूर - विधान परिषदेच्या आठ जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत बुधवारी संपल्यानंतर आता ही निवडणूक चुरशीची होणार हे स्पष्ट झाले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी केल्यानंतरही दोन्ही पक्षांना बंडखोरीचा सामना करावा लागत आहे. कोल्हापुरात काँग्रेसविरोधात, तर सोलापुरात राष्ट्रवादीविरोधात बंडखोरी झाल्याने दोन्ही पक्षांच्या अडचणी वाढल्या आहेत. आघाडीतील या भांडणाचा लाभ सत्ताधारी भाजप-शिवसेनेला होण्याची शक्यता आहे.

राज्य विधान परिषदेच्या ८ जागांसाठी येत्या २७ डिसेंबरला मतदान होत आहे. येत्या १२ डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यानंतर प्रत्येक मतदारसंघातून कोणाकोणामध्ये लढत होईल, याचे चित्र स्पष्ट होईल. या निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेने युती केली असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही आघाडी केली आहे. भाजप ५ आणि शिवसेना ३ जागा लढवणार आहे, तर काँग्रेस ४ आणि राष्ट्रवादी ३ जागा लढवणार आहे.
मुंबईत राष्ट्रवादीचे प्रसाद लाड यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरल्याने काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप यांच्यासमोरची अडचण वाढली आहे. माझी बंडखोरी नसून मी पक्षाचा राजीनामा देऊन हा अर्ज भरला असल्याचे प्रसाद लाड यांनी सांगितले. १० अपक्ष नगरसेवकांचा मला पाठिंबा आहे आणि अजून काही नगरसेवक माझ्या संपर्कात असल्याचेही ते म्हणाले.

नगरमध्ये ससाणे रिंगणात
अहमदनगरमध्ये अाघाडीची जागा राष्ट्रवादीला सुटली असून अरुण जगताप यांनी अधिकृत उमेदवारी दाखल केली अाहे. मात्र, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांनीही अपक्ष अर्ज भरल्यामुळे जगताप यांची डोकेदुखी वाढली आहे. ससाणे हे माजी आमदार आणि शिर्डी संस्थानचे माजी अध्यक्ष आहेत. ते गेल्या निवडणुकीत आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार होते, तर जगताप यांनी बंडखाेरी करून अपक्ष म्हणून निवडणूक जिंकली हाेती. त्यामुळे यंदा ससाणेंनी जगताप यांचा कित्ता गिरवला अाहे.

सोलापुरात मानेंची बंडखोरी
सोलापुरात राष्ट्रवादीचे उमेदवार दीपक साळुंखे यांच्याविरोधात काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी बंडखोरी केली आहे. माने यांनी आपल्याकडे ३९८ पैकी १५० मतदार असल्याचा दावा केला आहे. साळुंखेंविरोधात अपक्ष उमेदवार प्रशांत परिचारक यांनीही अर्ज भरला आहे. माने यांच्या बंडखोरीचा फटका साळुंखेंना बसू शकतो. दरम्यान माने यांनी वैयक्तिक अर्ज भरला असून, त्यांचा पक्षाची काहीही संबंध नसल्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संतोष पाटील यांनी बुधवारी स्पष्ट केले.
महाडिकांच्या पाठी भाजप ?
कोल्हापुरात काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली आहे. विद्यमान आमदार महादेव महाडिक यांच्याऐवजी माजी राज्यमंत्री सतेज पाटील यांना पक्षाने उमेदवारी दि ल्याने महाडिक यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. ‘पक्षाची नाराजी का आहे ते मला माहिती नाही, पण मी चौथ्यांदा विजयी होईन,’ असा विश्वास महाडिक यांनी व्यक्त केला आहे. महाडिक यांच्या ताराराणी आघाडीने नुकत्याच झालेल्या कोल्हापूर महापालिका निवडणुकीत भाजपशी हातमिळवणी केली. त्यामुळे भाजपची ताकद तीनवरून ३० च्या वर पोहोचली. यामुळे महाडिक यांचे तिकीट कापले जाणे निश्चितच होते. शिवसेना-भाजप युतीत ही जागा भाजपच्या कोट्यात आली असल्याने भाजप महाडिकांना मदत करेल, ही शक्यता आहे.
बातम्या आणखी आहेत...