आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विधान परिषद निवडणूक : ‘बाबां’नी शिकवला अजितदादांना धडा!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सेना- भाजप युतीच्या मदतीने काँग्रेसच्या पराभवासाठी ‘खड्डा’ खाेदणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला व या पक्षाचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधान परिषद निवडणुकीत चांगलाच धडा शिकवला. या निवडणुकीत कुठल्या परिस्थितीत राष्ट्रवादीशी आघाडी करू नये, यासाठी अाग्रही असलेल्या चव्हाणांनी त्यासाठी थेट पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडून फिल्डिंग लावली हाेती. पृथ्वीराजबाबांची ही रणनीती यशस्वी ठरल्याचे सहा जागांच्या निकालानंतर स्पष्ट झाले अाहे.

विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढलेल्या दाेन्ही काँग्रेसमधील संघर्ष सत्तेवरून पायउतार झाल्यानंतरही सुरूच अाहे. राज्यात भाजप- शिवसेनेचे बळ वाढत असताना विधान परिषद निवडणूक अाघाडीने लढविण्याचा पर्याय काँग्रेस व राष्ट्रवादीतील काही नेत्यांनी मांडला हाेता. त्यासाठी पृथ्वीराज चव्हाणांनी समान जागांचे वाटप करावे, अशी मागणी केली हाेती. मात्र, सहापैकी चार जागा ताब्यात असलेली राष्ट्रवादी केवळ दाेनच जागा मित्रपक्षाला देण्यास तयार हाेती, त्याला चव्हाण तयार नव्हते.

अाधीच संख्याबळाच्या जोरावर िवधान परिषदेत राष्ट्रवादीने िवरोधी पक्षनेतेपद तर मिळवले अाहे. त्यानंतरही सभापतिपदावरही दावा सांगितल्यामुळे काँग्रेस आधीच नाराज अाहे. तसेच राष्ट्रवादी एकीकडे आघाडी झाल्याचे दाखवते, पण प्रत्यक्षात काँग्रेसविराेधी रणनीती अाखून भाजप-शिवसेनेला मदत करते, याकडे चव्हाणांनी राहुल गांधींचे लक्ष वेधत अाघाडी न करण्याचा निर्णय त्यांच्याकडून वदवून घेतला. चव्हाणांचा हा प्रयत्न यशस्वी झाल्याचे निकालानंतर स्पष्ट हाेते. दरम्यान, ‘राष्ट्रवादीने सामंजस्याची भूमिका घेऊन अाघाडी केली असती तर दाेन्ही काॅंग्रेसचा फायदा झाला असता,’ अशी प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष अशाेक चव्हाण यांनी दिली.

देशमुखांना पायउतार केल्याचा राग
पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना काँग्रेसला विधान परिषद सभापतिपदावर दावा सोडावा लागला होता. सत्तेतील मित्रपक्ष राष्ट्रवादीने शिवाजीराव देशमुख यांच्यासारख्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याकडून केवळ संख्याबळाच्या जोरावर सभापतिपद काढून घेऊ नये, असे काँग्रेसला वाटत होते. मात्र, चव्हाणांची ही मागणी फेटाळून लावत राष्ट्रवादीने देशमुखांना हटवून रामराजे निंबाळकर यांना सभापती बनवले. हे शल्य पृथ्वीराज यांच्या मनात कायम हाेते.
साताऱ्यात राष्ट्रवादीला धाेबीपछाड
नांदेडसह यवतमाळची जागा काँग्रेससाठी सोडण्याची तयारी राष्ट्रवादीने केली होती; पण काँग्रेसने सांगली-साताऱ्यासाठी अाग्रह कायम ठेवला. परंतु अजित पवारांना ते मान्य नव्हते. प. महाराष्ट्रात काँग्रेसची ताकद कायम ठेवायची असल्यास सांगली- साताऱ्यात राष्ट्रवादीच्या आव्हानाचा सामना करायलाच हवा, असे पृथ्वीराजांनी पक्षश्रेष्ठींना पटवून दिले हाेते. त्यावरुनच अाघाडी न करण्याच्या सूचना श्रेष्ठींनी दिल्या व साताऱ्यात चव्हाणांनी राष्ट्रवादीचा पराभव करुन दाखवला.

राष्ट्रवादीची कारस्थाने केली उघड
जातीयवादी पक्षांना दूर ठेवण्यासाठी आघाडी हवी, असे राष्ट्रवादी एकीकडे सांगते. पण प्रत्यक्षात विराेधकांच्या मदतीने काॅंग्रेसलाच नुकसान पाेहाेचवते, हे पृथ्वीराज चव्हाणांनी वेळाेवेळी पक्षश्रेष्ठींना पटवून दिले. भाजप सरकारमध्येही राष्ट्रवादीचे नेते आपली कामे कशी करून घेतात, याचीही काही उदाहरणे त्यांनी दिली. एकाच वेळी दाेन्ही दगडांवर पाय ठेवणाऱ्या राष्ट्रवादीसाेबत जाणे काँग्रेसला घातक ठरू शकते, हे पक्षश्रेष्ठींच्या गळी उतरवण्यात चव्हाण यशस्वी झाले.

पुढे वाचा, पुण्यात अनिल भाेसलेंनी राखली ‘राष्ट्रवादी’ची लाज...
बातम्या आणखी आहेत...