आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पराभव राष्ट्रवादीच्या जिव्हारी, शरद पवारांनी मागवला अहवाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - विधान परिषदेच्या सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत झालेला मोठा पराभव राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिव्हारी लागला अाहे. या पराभवाची गंभीर दखल घेऊन पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्याबाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचना प्रदेशाध्यक्षांना दिल्या आहेत. विशेष म्हणजे या निवडणुकीत ताब्यात असलेल्या चारपैकी तीन जागा गमवाव्या लागल्याने या पराभवाची जबाबदारी निश्चित करण्याचा मानसही पवारांनी व्यक्त केला आहे. भविष्यात असा दगाफटका होऊ नये यासाठी हे पाऊल उचलण्यात येत अाहे.

काँग्रेसबरोबर आघाडी न करता सत्ताधाऱ्यांना पडद्याआडून मदत करण्याचे डावपेच राष्ट्रवादीच्या अंगावर उलटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात अाहे, तर दुसरीकडे काँग्रेसनेच भाजपबरोबर संगनमत करून राष्ट्रवादी काँग्रेसला एकाकी पाडण्याचा डाव खेळला, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला अाहे. विधान परिषदेच्या सहापैकी प्रत्येकी दोन जागांवर काँग्रेस तसेच भाजपचे उमेदवार विजयी झाले असून पूर्वी चार जागा ताब्यात असलेल्या राष्ट्रवादीच्या पदरात यंदा केवळ एकच जागा पडली आहे. राष्ट्रवादीसाठी हा मोठा फटका असून भंडारा- गोंदियाची जागा भाजपने, तर सातारा-सांगलीची जागा काँग्रेसने खेचून अाणल्याचे शल्य राष्ट्रवादीला बाेचत अाहे.

काँग्रेस आणि भाजपने संगनमत करून हा विजय मिळवला असल्याचा आरोप करणाऱ्या नवाब मलिक यांनी काही मुद्द्यांवर प्रकाश टाकला. ‘सातारा-सांगलीत राष्ट्रवादीचे मतदार अधिक असतानाही तेथे काँग्रेसने धनशक्तीचा सढळ हस्ते वापर केला, तर भंडारा-गोंदियात काँग्रेसने भाजपला रसद पुरवली. काँग्रेसने आपल्या धर्मनिरपेक्ष तत्त्वांच्या विरोधात जाऊन धर्मांध शक्तींना मदत केली,’ असा अाराेपही मलिक यांनी केला.

साताऱ्याच्या पराभवाचे खापर अजितदादांच्या माथी
ऐनवेळेला राष्ट्रवादीत दाखल झालेल्या शेखर गोरे यांना सातारा-सांगली मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. अजित पवार यांच्या आग्रहामुळे गोरे यांना ही उमेदवारी मिळाली होती. साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांचा मात्र गोरेंना जाेरदार विरोध होता. शिवाय राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनीही गोरेंना विरोध केला होता. सातारा-सांगलीतील स्थानिक स्वराज्य संस्थांचे मतदार हे मोठ्या संख्येने मराठा समाजाचे असून शेवटच्या क्षणी पक्षात आलेल्या धनगर समाजाच्या गोरेंना हा समाज मतदान करणार नाही, असे समजावून सांगूनही अजितदादांनी त्याकडे दुर्लक्ष केले. शेवटी उदयनराजे व जयंत पाटील यांच्या नाराजीचा फटका पक्षाला बसला, अशी जोरदार चर्चा आहे.
बातम्या आणखी आहेत...