आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्ताधारी-विरोधकांमध्ये रंगला फुटबॉल सामना; आमदारांचा खेळ, खेळाडूंचा मात्र खेळखंडोबा!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- “फुटबॉल हा शक्यतो पायाने खेळण्याचा खेळ आहे,” अशी मिश्किल आठवण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉमेंट्रीच्या माध्यमातून करून दिल्यानंतरही फुटबॉलच्या मैदानातील आमदार चक्क हाताने बॉल मारू लागले. हमरीतुमरीवर येत कोणी कुस्ती खेळण्याच्याच रंगात आले. फुटबॉलच्या मैदानातला हा ‘खेळखंडोबा’ पाहून उपस्थित प्रेक्षकांची मात्र हसून हसून पुरेवाट झाली.

निमित्त होते गुरुवारी विधानभवनात झालेल्या अध्यक्षीय संघ विरुद्ध सभापती संघ या प्रदर्शनीय सामन्याचे. सभागृहात एकमेकांच्या विरोधात बोलणारे आमदार फुटबॉलच्या मैदानात खांद्याला खांदा लावून खेळण्यासाठी उतरले होते. प्रेक्षकांमध्ये बसले होते अध्यक्षीय संघाचे कॅप्टन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, सभापती संघाचे कॅप्टन विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर. त्यांच्यासोबत उपसभापती माणिकराव ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार, जयंत पाटील, सुनील तटकरे, पंकजा मुंडे यांच्यासह अनेक आमदार-मंत्र्यांनी गर्दी केली होती.

सुटलेली पोटे आणि फिटनेसच्या अभावामुळे आमदारांची चांगलीच दमछाक झालेली दिसली. मुख्यमंत्र्यांच्या कॉमेंट्रीमुळे मात्र खेळाडू- प्रेक्षकांमध्ये सातत्याने हास्याचे कारंजे उडत होते. अध्यक्षीय संघाकड़ून आशिष शेलार, राज पुरोहित, जयकुमार गोरे, संग्राम थोपटे, संतोष दानवे, महेश लांडगे, राहुल कुल, इम्तियाज जलील, समीर मेघे आदींची फौज होती. तर त्यांच्या विरोधातल्या सभापती संघात संभाजी निलंगेकर, राहुल बोंद्रे, नरेंद्र पाटील, निरंजन डावखरे, योगेश टिळेकर, उन्मेष पाटील, परिणय फुके आदी आमदार होते.

खेळ सुरू असताना नरेंद्र पाटील, महेश लांडगे, इम्तियाज जलील यांच्यात बाचाबाची झाली. एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रसंग ओढवल्यानंतर मॅच रेफ्री म्हणून विनोद तावडे यांनी मध्यस्थी केली. फुटबॉलच्या मैदानात कुस्ती खेळता येणार नाही, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनीही वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. ३० मिनिटांच्या मर्यादित वेळेत अध्यक्षीय संघाने दोन विरुद्ध शून्य गोलने सभापती संघावर मात केली. त्यानंतरही खेळाडूंच्या आग्रहाखातर पेनल्टी शूटआऊट घेण्यात आला. यात मात्र दोन्ही संघांनी बरोबरी साधली. 

विजेत्या अध्यक्षीय संघाचे नेतृत्व अाशिष शेलार यांनी केले. या खेळामुळे आमदारांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. खेळ संपल्यानंतर दोन्ही सदनांचे सर्व सदस्य पुन्हा विधिमंडळाच्या कामकाजात भाग घेण्यासाठी गेले. दरम्यान, आमदारांनी असाच सराव चालू ठेवावा. नागपूर अधिवेशनात आमदारांचा क्रिकेट सामना खेळवला जाईल. महिला आमदारांचीही वेगळी मॅच होईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. फुटबॉल मॅचच्या निमित्ताने दैनंदिन कामकाजातून चांगला विरंगुळा मिळाल्याची प्रतिक्रिया सर्वच आमदारांनी व्यक्त केली. धनंजय मुंडे यांनीही खेळाडूंना प्रोत्साहन दिले.

अामदार सासऱ्याची संपत्ती थाेपटेंना बक्षीस
‘गोल करणाऱ्यास पाच लाखांचा निधी,’ अशी मजेदार प्रतिक्रिया खेळाडूंनी दिली. त्यावर कॉमेंट्री करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी ‘डीपीसीतून निधी मिळेल,’ असे म्हटल्यावर मैदानातल्या आणि प्रेक्षक गॅलरीतील आमदारांमध्ये  हशा पिकला. दोन गोल करणाऱ्या आमदार संग्राम थोपटे यांची फिरकी घेताना मुख्यमंत्र्यांनी ‘सासऱ्यांची सर्व संपत्ती जावई थोपटे यांना बक्षीस म्हणून जाहीर,’ ‘सासऱ्याचे कर्ज सोडून सर्व संपत्ती घेण्यास थोपटे तयार,’ असे सांगितले तेव्हा त्यांचे सासरे आमदार बबनदादा शिंदे यांच्यासकट अजित पवारांनाही हसू आवरले नाही. 

अजित पवारांच्या विराेधावर तावडेंची अचूक ‘किक’
विधानसभेचे कामकाज सुरू असताना सर्व सदस्यांना ‘सामन्यासाठी चला’, असा आग्रह विनोद तावडे यांनी धरला. त्याला अजित पवारांनी कडाडून विरोध केला. ‘आता धोतरात फुटबॉल खेळणार का,’ असा प्रश्न त्यांनी अध्यक्षांचे नाव न घेता  विचारला. ‘आधीच दोघांचे हात मोडलेत. पुन्हा पाय मोडायचेत का? ज्यांना हौस असेल त्यांनी खेळावे. आमचे खेळण्याचे वय उरलेले नाही. खेळापेक्षा इतर विषय महत्त्वाचे आहेत,’ असे अजित पवार त्र्याग्याने म्हणाले. त्यावर ‘अजितदादा, तुम्ही महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष आहात. महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातली दहा लाख मुले फुटबॉल खेळणार आहेत. त्यांना तुम्हाला प्रोत्साहन द्यायचे नसेल तर माझी हरकत नाही,’ अशी अचूक ‘किक’ तावडेंनी मारली. त्यानंतर मात्र पवारांचा विरोध क्षणात मावळला.

‘फिफा’चे निमित्त
जागतिक फुटबॉल महासंघाची (फिफा) १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धा ऑक्टोबरमध्ये भारतात होत आहे. या निमित्ताने क्रीडा संस्कृती रुजवण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनीही ‘महाराष्ट्र मिशन वन मिलियन’ची घोषणा केली आहे. या अभियानाच्या प्रसारासाठी आमदारांचा प्रदर्शनीय सामना गुरुवारी विधानमंडळाच्या आवारात खेळवण्यात अाला.

अध्यक्ष 11 टीम-
आशिष शेलार, इम्तियाज जलील, सुनील शिंदे, जयकुमार रावल, संग्राम थोपटे, जयकुमार गोरे, राज पुरोहित, राजू तोडा साम, महेश लांडगे, नरेंद्र पवार, राहुल कूल, संतोष दानवे

सभापती 11 टीम-
नरेंद्र पाटील, उन्मेष पाटील, निरंजन डावखरे, संभाजी निलंगेकर, जयंत जाधव, प्रशांत ठाकूर, परिणय फुके, बाळाराम पाटील

पुढील स्लाइडवर पाहा...सत्ताधारी-विरोधकांमध्ये रंगलेल्या फुटबॉल सामन्याचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...