आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेलंगणातील भाजपचे नेते विद्यासागर राव यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र: विद्यासागर राव)
मुंबई- राज्यपाल. के शंकरनारायणन यांना महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरून हटविल्यानंतर त्यांच्या जागी तेलंगणातील भाजपचे वरिष्ठ नेते विद्यासागर राव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज दुपारी राष्ट्रपती भवनातून चार राज्यांच्या राज्यपालांची नावे प्रसिद्ध केली. त्यात राव यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती केल्याचे म्हटले आहे.
आंध्रप्रदेशातील भाजपचे ज्येष्ठ नेते राहिलेल्या विद्यासागर राव यांनी अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात केंद्रीयमंत्रीपद भूषविले होते. आंध्र प्रदेशातील ( आताचे तेलंगणा) करीमनगर लोकसभा मतदारसंघातून राव दोन वेळा संसदेत पोहचले होते. याचबरोबर त्यांनी आंध्र प्रदेशातील विधानसभेत भाजपच्या विधी मंडळाचे नेतेपद भूषविताना तीन वेळा विधानसभेत आमदार म्हणून निवडून गेले होते. राव यांनी कायद्याची पदवी घेतली आहे.
महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या व पुढारलेल्या राज्याच्या राज्यपालपदी राव यांची वर्णी लागल्याने भाजपमधील नेत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. राव यांचे नाव कोणालाही अपेक्षित नव्हते व मोदींनी अचानक पुढे केल्याचे कळते. राव आणि मोदी यांची मागील दोन दशकापासून मैत्री असल्याचे पुढे येत आहे. मोदी दिल्लीत असताना राव केंद्रात मंत्री होते. याचबरोबर राव हे उच्चशिक्षीत व इंग्रजीवर प्रभुत्त्व असलेले नेते आहेत. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याचा राज्यपाल उच्चशिक्षीत असावा हा निकष मोदींनी लावल्याचे बोलले जात आहे.
राव यांच्या कुटुंबियांचा तेलंगणात राजकीय दबदबा आहे. त्याचे बंधू राजेश्वर राव हे कम्युनिस्ट नेते आहेत. तर, राव यांचा पुतण्या जर्मन रिटर्न असून सध्या तो टीआरएसचा आमदार आहे. तेलगंणातील विलेमा कम्युनिटीत राव कुटुंबियांचे वर्चस्व आहे. जनसंघापासूनच भाजपात असलेल्या राव यांनी तेलंगणात पक्ष वाढविण्यात मोठे योगदान दिल्याचे सांगितले जात आहे. राव यांच्या कुटुंबियांकडून चन्नामनेनी फाऊंडेशन चालवले जाते. शिक्षण, आरोग्य आणि पिण्याचे स्वच्छ पाणी आदी क्षेत्रात करीमनगर व सिरीसिलीया भागात या फाऊंडेशनचे चांगले काम असल्याचे सांगितले जाते.
राव यांच्याबरोबरच कर्नाटकच्या राज्यपालपदी वाजाभाई वाला, गोव्याच्या राज्यपालपदी मृदुला सिन्हा तर, राजस्थानच्या राज्यपालपदी कल्याणसिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे.