आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गेहलोत यांना काढावी लागली गर्दीतून वाट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विलासराव यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहण्यासाठी देश आणि राज्यभरातून आलेल्या व्हीआयपींची बुधवारी दमछाक झाली. गर्दीमुळे पुढे वाहनच जाणे शक्य नसल्यामुळे मंत्र्यांच्या गाड्या सहा ते सात किलोमीटर अंतरावरच थांबवाव्या लागल्या. त्यामुळे त्यांना पायपीट करीत अंत्यविधीस्थळी जावे लागले, तर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि पतंगराव कदमांसारख्या दिग्गज नेत्यांना गर्दीतून विनंती करीत वाट काढावी लागली.
बुधवारी पंतप्रधान मनमोहनसिंग, सोनिया गांधी यांच्यासह देश आणि राज्यभरातले व्हीआयपी लातूरमध्ये आले होते. एरवी असे व्हीआयपी येणार म्हटले की, सामान्यांना बाजूला सारून त्यांच्यासाठी वाट करून देण्यात येते. मात्र, प्रशासनाने गृहीत धरलेल्या गर्दीपेक्षा कितीतरी जास्त लोक अंत्यविधीसाठी आल्यामुळे नियोजन कोलमडून पडले. सुरुवातीला पोलिसांनी लातूर-बाभळगाव रस्त्यावरील पोलिस मुख्यालयानजीक नाकाबंदी केली. त्यापुढे केवळ व्हीआयपी गाड्या जातील, असे नियोजन होते. गर्दी वाढत गेली. त्यानंतर नाकाबंदी अलीकडे आरटीओ ऑफिसजवळ करण्यात आली. तासाभरात तो पॅचही वाहनांनी जॅम झाला. त्यामुळे बाभळगाव नाक्याजवळच वाहनांना प्रवेश बंदी करावी लागली. त्याचा फटका जसा सामान्यांना बसला तसा तो व्हीआयपींनाही बसला. सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील बाभळगाव नाक्यावर आल्यानंतर त्यांची गाडी पुढे नेणे अशक्य झाले. परिस्थिती ओळखून पाटील यांनी पायी जाण्याचा निर्णय घेतला. रस्त्यात भेटलेल्या एका दुचाकीस्वाराला त्यांनी आपली ओळख करून देत शक्य तितक्या पुढे सोडण्याची विनंती केली. रस्त्यातल्या पोलिसाने दुचाकीला अडवले की, पाटील आपण मंत्री असल्याचे सांगायचे, त्यांना कुणी तरी ओळखायचे आणि ते पुढे जायचे. तासाभराने ते अंत्यविधीस्थळी पोहोचले. व्हीआयपी गेटपर्यंत पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे त्यांना गर्दीतून वाट काढीत यावे लागले. त्यांच्यापाठोपाठ राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोतही त्याच गर्दीतून पुढे आले. आरोग्य राज्यमंत्री फौजिया खान यांचेही वाहन दूरवर थांबले. त्यांनीही किमान पाच किमीची पायपीट केली. त्यांच्यापाठोपाठ विजयसिंह मोहिते-पाटील, पतंगराव कदमांनाही त्याच गर्दीतून यावे लागले.
मान्यवरांच्या संवेदना
पंतप्रधान मनमोहन सिंग, सोनिया गांधी, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, देशाचे कृषिमंत्री शरद पवार, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, राज्यपाल के. शंकरनारायणन, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री आर. आर. पाटील, भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी, मनसे प्रमुख राज ठाकरे, शर्मिला ठाकरे, खासदार गोपीनाथ मुंडे, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री धरमसिंग, मल्लिकार्जुन खारगे, एन. डी. पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, कृषिमंत्री बाळासाहेब थोरात, केंद्रीय मंत्री राजीव शुक्ला, बांधकाममंत्री छगन भुजबळ, आदिवासी विकासमंत्री बबनराव पाचपुते, वनमंत्री पतंगराव कदम, उद्योगमंत्री नारायण राणे, पाणीपुरवठामंत्री लक्ष्मणराव ढोबळे, पशुसंवर्धनमंत्री मधुकरराव चव्हाण, शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, बांधकाममंत्री जयदत्त क्षीरसागर, पाटबंधारेमंत्री सुनील तटकरे, राज्यमंत्री फौजिया खान, प्रकाश सोळुंके, पालकमंत्री सतेज पाटील, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, विधानसभेचे सभापती दिलीप वळसे पाटील, उपसभापती वसंत पुरके, खासदार जनार्दन वाघमारे, जयंत आवळे, पद्मसिंह पाटील, शिवाजीराव पाटील, माणिकराव ठाकरे, विनोद तावडे, रामदास आठवले, डॉ. भालचंद्र मुणगेकर, दिलीप गांधी, काँग्रेसचे सरचिटणीस सागर रायका व अलका लांबा, मधुकरराव पिचड आंदीची उपस्थिती होती.