आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुहृदांनी जागवल्या विलासरावांच्या आठवणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राजकारण धुरंधर. वक्तृत्वकुशल. हजरजबाबी. कलासक्त विलासराव. यासह विलासराव देशमुख यांच्या ऋजू व्यक्तिमत्त्वातील अशा अनेक पैलूंच्या आठवणींना सोमवारी त्यांच्या जिव्हाळ्याच्या मित्रांनी उजाळा दिला.

माजी केंद्रीय मंत्री विलासरावांच्या कर्तृत्वाचा आढावा घेणार्‍या ‘राजहंस’ या ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावेलिखित पुस्तकाचे प्रकाशन रवींद्र नाट्यमंदिरात झाले. या वेळी उद्योगमंत्री नारायण राणे, खासदार गोपीनाथ मुंडे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री सुनील तटकरे, संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील, सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, अभिनेता प्रशांत दामले हे विलासरावांच्या आठवणीत काही काळ हरवून गेले.

विरोधकांचेही कौतुक करणारा नेता : राणे
दुसर्‍याची प्रशंसा करण्यासाठी मन मोठे असावे लागते. राजकारणी अनेक पाहिले. पण विलासरावांइतका दिलदार राजकारणी पाहिला नाही, अशा शब्दांत राणे यांनी विलासरावांचा गौरव केला. नागपूर अधिवेशनात काही संघटनांनी विदर्भ बंदची हाक दिली होती. त्या वेळी आपण एकसंध महाराष्ट्राच्या बाजूने ठरावावर दोन तास वीस मिनिटे भाषण केले होते. भाषणानंतर मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवरून उठून विरोधी पक्षनेत्याच्या आसनापर्यंत येऊन भाषणाचे कौतुक करणारे विलासराव होते.

तटकरेंची कृतज्ञता : विलासरावांमुळेच आपण राजकीय राजमार्गावरून चालू शकल्याची कृतज्ञता तटकरे यांनी व्यक्त केली. प्रशासक म्हणून त्यांची सर्वच विभागांवर पकड होती, असे गौरवोद्गार थोरात यांनी काढले.

सेंट्रल हॉलकडे फिरकलो नाही : मुंडे
गोपीनाथ मुंडे व विलासरावांची मैत्री सर्वर्शुतच होती. विलासराव व आपल्या पहिल्यावहिल्या आमदारकीच्या तसेच त्या दोघांमधील मैत्रीच्या अनेक आठवणी मुंडे यांनी जागवल्या. कॉलेजच्या काळापासून सुरू झालेली मैत्री त्यांच्या निधनापर्यंत कायम होती. कॅन्सरचे दुखणे स्वत:जवळ ठेवत ते कायम हसतमुखच राहिले. रडणे नव्हे, तर लढणे हा त्यांचा स्वभाव होता, अशा शब्दांत मुंडे यांनी आपल्या जवळच्या मित्राला आदरांजली वाहिली. खासदार म्हणून दिल्लीत गेल्यानंतर संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये आम्ही किमान दोन तास गप्पा मारायचो. विलासराव गेल्यानंतर मी त्या हॉलकडे फिरकलेलो नाही. कारण त्यांची आठवण त्रास देते, अशा शब्दांत मुंडे यांनी मित्रवियोगाचा शोक व्यक्त केला.