आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
चेन्नई - केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री विलासराव देशमुख यांची प्रकृती अत्यवस्थ परंतु स्थिर आहे. डॉक्टरांच्या उपचारांना ते प्रतिसाद देत आहेत. किंचित सुधारणा झाली आहे. विलासरावांवर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रीया करावयाची आहे. परंतु, जंतुसंसर्ग झाल्यामुळे त्यात अडचणी आहेत. जंतुसंसर्ग कमी झाल्यानंतरच शस्त्रक्रीया करण्यात येईल, असे डॉक्टरांनी सांगितले.
विलासरावांना सोमवारी चेन्नईतील ग्लोबल रुणालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार करणार्या डॉक्टरांच्या मते विलासरावांच्या दोन्ही मूत्रपिंड (किडनी) आणि यकृत (लिव्हर) निकामी झाले आहे. त्यांच्या लिव्हरमध्ये कॅन्सर (हॅपेटोसेल्युलर कार्सिनोमा) आहे. तथापि, कुटुंबीयांनी मज्जाव केल्याने रुग्णालयाने हेल्थ बुलेटिन जारी केलेले नाही.
ग्लोबल रुग्णालयातील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार विलासरावांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. प्रकृतीत सुधारणा होत नाही तोवर त्यांच्यावर लिव्हर प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करता येणार नाही, असे ग्लोबल हॉस्पिटलच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे. दरम्यान, पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी विलासरावांच्या खात्याचा अतिरिक्त प्रभार केंद्रीय लघुउद्योग मंत्री वायलर रवी यांच्याकडे सोपवला आहे.
दरम्यान, विलासरावांची प्रकृती सुधारावी यासाठी लातूर जिल्ह्यात ठिकठिकाणी अभिषेक, पूजा व सर्वधर्मीय प्रार्थना करण्यात येत आहे. ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिरातही मंगळवारी अभिषेक करण्यात आला.
वर्षभरापूर्वीच झाले होते निदान - विलासरावांवर उपचार करणार्या मुंबईतील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या लिव्हरमध्ये दोष असल्याचे निदान वर्षभरापूर्वीच झाले होते. उपचारासाठी दोन-तीन वेळा ते परदेशातही गेले होते. मध्यंतरी प्रकृतीत थोडी सुधारणा झाली होती. परंतु आठवडाभरापूर्वी तब्येत अचानक ढासळली. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. दोन-तीन दिवस डायलिसिसवर ठेवण्यात आले. प्रकृतीत सुधारणा न झाल्याने सोमवारी एअर अँब्युलन्सने चेन्नईला हलवण्यात आले. चेन्नईत डॉ. मोहंमद रेला त्यांच्यावर उपचार करत आहेत. डॉ. रेला हे लंडनमधील किंग्ज रुग्णालयातील ख्यातनाम डॉक्टर आहेत.
लिव्हर देण्यास रितेश तयार - विलासरावांचा मुलगा अभिनेता रितेश याने आपल्या लिव्हरचा भाग देण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. तथापि, रितेशच्या पेशींची चाचणी अद्याप व्हायची आहे. डॉक्टरांच्या मते मुंबईतही लिव्हर ट्रान्सप्लांट होऊ शकले असते, परंतु कुटुंबीयांच्या विश्वासाचा प्रश्न असल्यामुळे विलासरावांना चेन्नईला हलवण्यात आले.
माणिकराव चेन्नईत, मुख्यमंत्र्यांकडून विचारपूस
विलासरावांना किडनी देण्याची तयारी
विलासराव देशमुखांची प्रकृती बिघडली
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.