आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vinay Kore News In Marathi, Jansurajya Party, Divya Marathi

जनसुराज्य पंधरा जागा लढवणार, आमदार कोरेंची मुंबईत घोषणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत जनसुराज्य पक्ष 15 जागा लढवणार आहे, अशी घोषणा पक्षाचे अध्यक्ष व आमदार विनय कोरे यांनी रविवारी मुंबईतील पक्षाच्या मेळाव्यात केली.महायुती नको आणि लोकशाही आघाडीसुद्धा नको म्हणणारी राज्यात मोठी लोकसंख्या आहे. या दोघांना कंटाळलेल्या जनतेला तिसरा पर्याय हवा आहे. तो पर्याय देण्याचा जनसुराज्य पक्ष प्रयत्न करणार असल्याचे कोरे यांनी मेळाव्यातील भाषणात सांगितले.

चुनाभट्टी येथील टिळक क्लब येथे जनसुराज्य पक्षाने आज शक्तिप्रदर्शन केले. या मेळाव्यास कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, नांदेड, नाशिक आणि अमरावती जिल्ह्यांतील 15 मतदारसंघांत जनसुराज्य पक्ष आपले उमेदवार उभे करणार आहे. तिस-या आघाडीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र, अशी आघाडी उभारण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, अशी माहिती कोरे यांनी दिली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जनसुराज्य पक्षाने मनसे, शेकापबरोबर आघाडी केली होती. आगामी विधानसभेला शेकाप, मनसे महायुतीत असण्याची शक्यता नाही. त्यामुळे जनसुराज्य पक्ष शेकाप-मनसेबरोबर घरोबा करण्याची दाट शक्यता आहे.

जनसुराज्य पक्ष आणि खासदार राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना यांचे कार्यक्षेत्र एकच आहे. शेट्टी यांच्यामुळे जनसुराज्यला महायुतीची दारे बंद आहेत. त्यामुळे जनसुराज्य पक्षाला तिस-या आघाडीत सामील होण्याशिवाय पर्याय नाही.

लिंगायत व्होट बँक
पक्षाचे अध्यक्ष विनय कोरे शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. सहकारी चळवळीतून कोरे यांचे नेतृत्व पुढे आलेले आहे. दूध आणि दुग्धपदार्थाचा त्यांचा‘वारणा’ ब्रँड प्रसिद्ध आहे. कोरे लिंगायत समाजाचे आहेत. त्यामुळे लिंगायत समाजाचे प्राबल्य असलेल्या सोलापूर, सांगली, कोल्हापूर, लातूर, नांदेड या राज्याच्या सीमावर्ती जिल्ह्यांत जनसुराज्य पक्षाचा चांगला जनाधार आहे.