आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vinayak Mete Critics On Sharad Pawar On The Issue Of Maratha Reservation

मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांना उशिरा जाग आली- विनायक मेटेंची टीका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मराठा आरक्षणावरून शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य केले आहे. लोकसभा निवडणुकीत फटका दिसणार असल्याचे दिसताच पवारांना आता मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत जाग आली आहे पण ही जाग आता फारच उशिरा आलेली आहे अशी टीका मेंटेंनी त्यांच्यावर केली आहे. इतक्या वर्षांपासून सरकार आणि पक्षासमोर हा विषय मांडत असताना त्याकडे पवारांनी लक्ष का घातले नाही असा सवाल करीत अजूनही वेळ गेलेली नाही आतातरी सरकारला हा निर्णय घेण्यास भाग पाडावे, असे आवाहन मेटेंनी केले. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या लढाईला मुंबईच्या डबेवाल्यांनीही पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे.
मेटे म्हणाले, मराठा आरक्षणाचा प्रश्‍न सोडविण्यास सरकारला अपयश आल्याने मराठा समाजाच्या नाराजीचा फटका लोकसभा निवडणुकीत बसला असून त्याचा निकालावर परिणाम झालेला पाहायला मिळेल. या नाराजीची पुनरावृत्ती टाळायची असेल तर सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय तातडीने घ्यायला हवा, असे भाष्य शरद पवार यांनी आपल्या पक्षाच्या नेत्याच्या आढावा बैठकीत केले होते. त्यांच्या या वक्तव्याची आठवण करून देताना आमदार विनायक मेटे यांनी पवारांवर टीका केली. लोकसभा निवडणुकीनंतर मराठा आरक्षण जाहीर करण्यात येईल, असे काँग्रेस आघाडी सरकारने आश्‍वासन दिले होते. त्यानुसार सरकारने गुरुवारी होणार्‍या एकदिवसीय विधान परिषदेच्या अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणाची घोषणा करावी, असे आवाहन मेटे यांनी केले.
दरम्यान, मुंबईतील डबेवाल्यांना सरकारने अद्याप काहीच दिलेले नाही. या अन्यायावर आवाज उठविण्यासाठी सर्व डबेवाल्यांना एकत्र घेऊन लढा उभारणार आहे, असे सांगतानाच सदर लढ्याची सुरुवात 9 मे रोजी दादर येथे मराठा आरक्षणाचा मेळावा घेऊन करणार असल्याचे मेटे म्हणाले. या मेळाव्याला सुभाष देसाई, गोपीनाथ मुंडे, विनोद तावडे, रामदास आठवले, राजू शेट्टी, महादेव जानकर आदी नेते मार्गदर्शन करणार असल्याचे मेटे यांनी सांगितले.