आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vinayak Mete News In Marathi , Chhagan Bhujbal, Ajit Pawar

छगन भुजबळांवर मेटे घसरले; अजित पवार यांच्यावर उधळली स्तुतिसुमने

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- शरीराने राष्ट्रवादी काँगे्रेस पण, मनाने भाजपमध्ये अशी अवस्था असलेल्या विनायक मेटेंनी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळांवर आगपाखड केली आहे. मात्र, त्याचवेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर कौतुकाचा वर्षाव केला. मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले होते. विनायक मेटे यांची ही खेळी म्हणजे राजकीय अस्तित्व कायम ठेवण्याची धडपड असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

भुजबळ यांनी आपल्यावर कारवाई करण्यासाठी पक्षावर दबाव आणला. मराठा समाजाला फक्त मराठी मतांसाठी वापरून घेतले. पक्षालाही भुजबळांचे समता परिषदेचेच काम चालते. मात्र, मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या वर्गाला आरक्षण मिळवून देण्याचे माझे कार्य दिसत नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणे, हा माझा गुन्हा ठरतो का? असे उत्तरही मेटेंनी त्यांना पक्षाने बजावलेल्या कारणे दाखवा नोटिसीला दिले होते. राष्ट्रवादी काँगे्रस पक्ष भुजबळांच्या दावणीला बांधला गेला आहे. त्यांनी तक्रार केली म्हणून माझ्यावर एकतर्फी कारवाई करताना पक्षाने विचार करायला हवा होता, असेही मेटेंनी आपल्या उत्तरात म्हटले आहे. पक्षासाठी अनेक वर्षे खस्ता खाऊनही नोटीस पाठवताना आपल्याला साधे विचारलेही नाही, याची जाहीर नाराजी मेटेंनी व्यक्त केली. त्यामुळे त्यांच्या आगामी भूमिकेकडे राजकीय वर्तुळासह सर्वांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादीकडे लक्ष
पक्षविरोधी वक्तव्य व कारवायांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने विनायक मेटे यांना नोटीस बजावली आहे. त्याला मेटेंनेही त्याच भाषेत उत्तर दिले. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस मेटेंवर खरंच कारवाई करणार का? आणि ती काय असेल? याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

मेटे भाजपच्या वाटेवर
राष्ट्रवादी काँगे्रसवर टोकाची टीका केल्यामुळे पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल आपल्याला बाहेरचा रस्ता दाखवणार हे नक्की असल्याने मेटे यांनी आधीच भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्याशी संधान बांधले आहे. लवकरच ते भाजपमध्ये प्रवेश करतील. शिवसंग्राम संघटनेच्या माध्यमातून मराठा प्राबल्य असलेल्या मतदारसंघात ते महायुतीचा प्रचार करतील आणि या बदल्यात मेटेंना भाजपकडून योग्य तो न्याय दिला जाईल, अशीही चर्चा आहे.