मुंबई - महायुती तुटल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्षाप्रमाणेच रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षानेही भाजपसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष
अमित शहा यांच्या उपस्थितीत मुंबईत आठवलेंनी
आपला निर्णय जाहीर केला. पण रिसोडच्या जागेवरून नाराज झालेले शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे हे भाजपशी फारकत घेणार आहेत. याबाबतचा निर्णय ते रविवारी जाहीर करणार आहेत.
आम्ही रिपाइंला दोन आकडी जागांची मागणी केली होती, मात्र महायुतीत ती पूर्ण होऊ शकली नाही. आता भाजपने आम्हाला विधानसभेच्या ८ जागा, केंद्रात मंत्रिपद आणि राज्यात सत्ता आल्यास त्यात दहा टक्के वाटा देण्याचे आश्वासन दिले आहे, असा दावा आठवलेंनी पत्रकारांशी बोलताना केला. दरम्यान, आठवलेंनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने आता पूर्वीच्या महायुतीतील भाजपसह इतर चारही पक्ष एकत्र आले असून शिवसेना मात्र एकाकी पडली आहे.