आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vinod Tavade, Ashish Shelar On Shivsena\'s Hitlist For Assembly Election

विनोद तावडे, आशिष शेलारांना पराभवाची धूळ चारण्याचा विडा शिवसैनिकांनी उचलला!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- गेल्या 25 वर्षापासून अभेद्य असलेल्या शिवसेना-भाजप युतीचे मारेकरी हे एकनाथ खडसे, विनोद तावडे, सुधीर मुनगुंटीवर आणि आशीष शेलार हेच आहेत, अशी भावना संबंध शिवसैनिकांची झाल्याने या विधानसभा निवडणुकीत युतीच्या घरभेद्यांना पराभवाची धूळ चारण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. वांद्रे (पश्चिम)मधून शेलार आणि बोरिवलीतून तावडेंना 100 टक्के पराभवाची चव चाखायला लावण्याची तर, खडसे-मुनगुंटीवर यांना पाडण्यासाठी व्यूहरचना तयार करण्यात येत असल्याचे सूत्रांकडून कळते. दरम्यान, शिवसैनिकांना फूस लावण्यामागे सेनेचे नेतृत्त्वच असल्याचे बोलले जात आहे.
बाळासाहेब ठाकरे व प्रमोद महाजन या जोडीने हिंदुत्वाची नाळ असलेल्या दोन्ही पक्षांना जोडत 90 च्या दशकात युती घडवून आणली. मागील 25 वर्षापासून या दोन्ही पक्षांत कितीही वाद झाले तरी युती तोडण्याचे पाप केले नाही. मात्र, पाच महिन्यापूर्वी केंद्रात भाजपचे बहुमताचे सरकार स्थापन होताच हा पक्ष एकदम हवेत गेल्याची भावना शिवसेनेची आहे. त्यातही युती तोडण्यास भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा, नितीन गडकरी, एकनाथ खडसे, सुधीर मुनगुंटीवार, विनोद तावडे आणि आशिष शेलार हे नेते सेनेसोबतची युती तोडण्याच्या बाजूने होते. केंद्रीय नेतृत्त्वाने प्रदेश पातळीवर निर्णय घेण्याचे सर्वाधिकार दिल्यानंतर गडकरींच्या आशीर्वादाने खडसे-तावडे-शेलारांनी युती तोडण्यावर शिक्कामोर्तब केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे शिवसैनिकांत या चौघडीबाबत चांगलीच खदखद आहे.
गडकरींचा हिशोब नंतर कधीतरी चुकता करता येईल असे सांगत मुंबईतील तावडे-शेलारांना पराभवाची धूळ चारण्यासाठी मुंबईतील शिवसैनिक सज्ज झाले आहेत. खडसेंना पराभूत करण्यासाठी वेगळी रणनिती आखण्यात येत आहे. खडसे गेली 6 विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. त्यांना पराभूत करणे कठिण आहे. मात्र, विरोधी पक्षांशी संगनमत करून त्यांना पाडणे शक्य असल्याचे जळगावमधील शिवसैनिकांचे म्हणणे आहे. विनोद तावडे व शेलार हे पहिल्यापासून मुंडे विरोधक व गडकरी समर्थक मानले जातात. आता तावडे मुंबईतील बोरिवलीत उभे आहेत. त्यांना पराभूत करता यावे म्हणून सेनेने हुशारीने उत्तमप्रकाश अग्रवाल या गुजराती समाजाच्या व्यक्तीला उमेदवारी दिली आहे. गुजराती- मारवाडी समाजाचा उमेदवार देऊन भाजपची पारंपारिक सर्व मते आपल्याकडे खेचून कशी आणता येतील याची यशस्वी खेळी खेळली आहे. याचबरोबर मराठी मते अग्रवाल यांनाच कशी पडतील याची काळजी प्रत्येक शिवसैनिक घेणार आहे.
वांद्रे (पश्चिम) मतदारसंघात आशीष शेलार यांच्या विरोधात शिवसेनेने विलास चावरी यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात पूर्ण शक्ती पणाला लावून शेलार यांना हरवण्याचा शिवसेनेने चंगच बांधला आहे. या ठिकाणाहून शिवसेनेचाच उमेदवार आणण्याचा विश्वास सेनेचे पदाधिकारी व्यक्त करत आहेत. काँग्रेसचा उमेदवार चालेल पण युतीच्या गद्दारांना धडा शिकवणे हेच शिवसेनेचे प्रमुख ध्येय व उद्दिष्ट असल्याचे शिवसेनेच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. दरम्यान, या घडामोडीमागे थेट मातोश्रीवरूनच आदेश आल्याचे बोलले जात आहे.
याबाबत बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस म्हणाले, खडसे यांना कोणीही पाडू शकत नाही. तर, तावडे व शेलार यांना भाजपचे कार्यकर्ते निवडून आणतील. शिवसेनेने आपला प्रमुख शत्रू कोण आहे हे आधी ठरवावे मगच इतरांचा विचार करावा. उद्धव ठाकरेंना पत्रकारांनी याबाबत छेडले असता ते म्हणाले, मी माझे सर्व उमेदवार सर्वत्र जिंकण्यासाठी उभे केले आहेत. कोणाला पराभूत करण्यासाठी ते उभे नाहीत, असे उत्तर दिले.