आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vinod Tavade Is A Poster Boy Of Bjp Raj Critics At Charkhop, Mumbai

...हा तर भाजपचा पोस्टरबॉय! बोरिवलीतून लढणा-या तावडेंची राजने उडविली खिल्ली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- विनोद तावडे हे भाजपचे पोस्टरबॉय असल्याची खरमरीत टीका मनसेप्रमुख राज ठाकरेंनी तावडेंचे नाव न घेता केली आहे. मंगळवारी रात्री चारकोपमध्ये झालेल्या जाहीर सभेत राज यांनी भाजपवर जोरदार टीका करतानाच तावडेंची चांगलीच खिल्ली उडवली.
विनोद तावडे प्रदेश भाजपचे एक प्रमुख नेते. मात्र तावडेंचा राजकीय प्रवास दारामागचाच राहिला आहे. लोकांमधून ते आतापर्यंत कधीही निवडून आले नाहीत. ते कायम विधान परिषदेवर निवडून गेले आहेत. यंदा मात्र प्रथमच तावडे विधानसभेच्या आखाड्यात उतरले आहेत. मात्र, हे करतानाही तावडेंनी पराभवाच्या भीतीने भाजपबहुल व गुजराती लोकांचा सर्वाधिक मतदार असलेला सुरक्षित मतदारसंघ निवडला आहे. बोरिवलीचे भाजपचे आमदार गोपाळ शेट्टी लोकसभेवर निवडून गेले आहेत. शेट्टी व भाजपने हा मतदारसंघ कायम आपल्याकडे ठेवण्यात यश मिळविले होते. याचे कारण येथे भाजपला मानणारा वर्ग आहे. या परिसरात गुजराती लोकांची मोठी लोकसंख्या आहे. त्यामुळे येथील गुजराती समाज कायमच भाजपमागे राहत असल्याचे दिसून येते. याचबरोबर यापूर्वी सेना-भाजप युती असल्याने मराठी व सेनेची मतेही शेट्टींना पडत असे. त्यामुळे शेट्टी विधानसभेत सहज निवडून जात असत. आता भाजपसोबतची युती तुटल्यानंतर तावडेंचा पराभव करण्याचा शिवसैनिकांनी चंग बांधला आहे.
विनोद तावडे हे कोकणातील असले तरी त्यांची राजकीय जडणघडण मुंबईतच झाली आहे. सध्या ते विलेपार्ले भागात राहतात. मात्र विधानसभेसाठी त्यांनी सुरक्षित मतदारसंघ म्हणून बोरीवलीची निवड केली आहे. तावडे ज्या भागात राहतात त्या विलेपार्ल्याची जागा पराग अळवणीच्या गळ्यात बांधून तावडेंनी आपली सुटका करून घेतली आहे. या मतदारसंघात मराठी मते निर्णायक असल्याने तावडेंनी तेथून पळ काढल्याचे बोलले जात आहे.
बोरीवलीतून यंदा भाजपकडून हेमेंद्र मेहता यांच्यासह मनिषा चौधरी उत्सूक होत्या. मात्र मेहतांना मागठाणेमधून उमेदवारी देत त्यांचा पत्ता कट केला, तर मनिषा चौधरींना दहिसरमध्ये पाठवण्यात आले आहे. मागठाणेतून मनसेचे प्रवीण दरकेर आमदार आहेत व पक्षाने त्यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. दरेकर यांच्यापुढे आपली डाळ शिजणार नाही हे ओळखून तावडेंनी तेथून माघार घेतली.
हा संदर्भ लक्षात घेऊन राज ठाकरेंनी मंगळवारी रात्री झालेल्या सभेत तावडेंची जोरदार खिल्ली उडविली. तावडेंचे नाव न घेता राज म्हणाले, ‘इथं एक येडं उभं राहिलयं... स्वत:चा मतदारसंघ सोडून आलायं. घर कुठे? उभा रहातोय कुठून...सगळी नौटंकी नुसती...पोस्टरबॉय आहे नुसता भाजपचा...’ याच्या सभेला गर्दी होत नाही, यांचं ऐकायला कोणी येत नाही. नरेंद्र मोदी बीडच्या सभेत जे बोलले ते अगदी खरचं होतं. जर गोपीनाथ मुंडे असते तर आपल्याला एवढ्या सभा घेण्यासाठी येण्याची देखील गरज उरली नसती. मात्र यांच्याकडे मुंबईतील गल्लीत सभा घेण्यासाठी देखील नेते नाहीत अशी खिल्ली राज यांनी उडविली.