आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vinod Tawade News In Marathi, Pandhurang Phundkar, BJP, Divya Marathi

पांडुरंग फुंडकर, तावडेंचा पत्ता कट;विधान परिषदेसाठी भाजपतर्फे सुनील राणे, केळकर शर्यतीत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - विधान परिषदेतील उमेदवारीवरून भाजपमधील अंतर्गत कलह उघड झाला आहे. विरोधी पक्षनेते विनोद तावडे तसेच पांडुरंग फुंडकर यांना आणखी किती वर्षे आमदारकीची संधी दिली जाणार, असा प्रश्न भाजपच्या युवा नेत्यांनी उपस्थित केला. त्याचे पडसाद थेट दिल्लीत उमटले असून भाजपचे राष्‍ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह तसेच नितीन गडकरी यांनीही युवा नेत्यांना संधी मिळावी, अशी भूमिका घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे तावडे, फुंडकरांचा पत्ता कट करून सुनील राणे, नीता केळकर, अरुण अडसद यांच्यापैकी दोघांना संधी मिळेल,असे कळते.


विधान परिषदेचे उमेदवार ठरवण्यासाठी दिल्लीत झालेल्या बैठकीत राजनाथ व गडकरी यांनी नवीन चेह-यांच्या बाजूने कौल दिला. यामुळे तावडे व फुंडकर यांचा निरोप समारंभ ठरला असल्याचे बोलले जाते. विशेष म्हणजे तावडेंना याआधी सतत गडकरींचे समर्थन मिळत होते. मात्र, प्रथमच गडकरींनी तावडेंना पुरेशी संधी मिळाली, अशी भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. फुंडकरांना ज्येष्ठत्वाचा मान राखत पक्षाने लागोपाठच्या आमदारकीसह विरोधी पक्षनेतेपदही दिले होते. मात्र, यापुढे तिस-यांदा त्यांनाच आमदकी दिल्यास पक्षातील कार्यकर्त्यांसमोर चुकीचा संदेश जाऊ शकतो, असे पक्षधुरीणांचे म्हणणे आहे.


कार्यकर्त्यांचा मुंडेंना सवाल!
दोन दिवसांपूर्वी भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा नीता केळकर यांच्यासह महिला कार्यकर्त्यांनी गोपीनाथ मुंडे यांची भेट घेऊन आता युवकांना विधान परिषदेवर संधी मिळाली पाहिजे, अशी आग्रही भूमिका घेतली.
आणखी किती वर्षे तेच तेच चेहरे दिले जाणार, असा सवाल या कार्यकर्त्यांनी मुंडेंकडे केला. शुक्रवारीही पुन्हा केळकर यांच्यासह राणे व अडसद यांनी कार्यकर्त्यांसह मुंडेंची भेट घेऊन युवकांनाच संधी मिळाली पाहिजे, असे पुन्हा एकदा ठासून सांगितले.


शिवसेना तावडेंवर नाराज
दोन उमेदवार परिषदेवर पाठवण्यासाठी भाजपला 11 मते कमी पडत आहेत. त्यातच शिवसेनेने नीलम गो-हे यांच्यासह राहुल नार्वेकर यांचा उमेदवारी अर्ज भरल्याने भाजपची अडचण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मनसेची मदत घेण्यासाठी विनोद तावडे यांनी थेट कुष्णकुंज गाठल्याने शिवसेना प्रचंड नाराज झाली आहे. आता तावडेंना मदत न करण्याचा आदेश मातोश्रीवरून दिल्याची माहिती आहे.


दिल्लीत झालेल्या बैठकीत तावडे यांनी सहा महिने विनापद राहावे आणि नंतर विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जावे, असा सूर उमटला. यामुळे तावडे संतप्त झाले. मात्र, तावडेंना बोलण्याची अधिक संधी न देता राजनाथ कर्नाटकाच्या दौ-यावर निघून गेल्याचे सूत्रांकडून समजते.