आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी सिनेमा ‘प्राईम टाईम’मध्येच दाखवणार - विनोद तावडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मराठी चित्रपटांना मल्टिप्लेक्समध्ये ‘प्राइम टाइम’ मिळणार असून आता १२ ते ९ या मुख्य वेळेतच हे चित्रपट दाखवले जाणार आहेत, अशी घोषणा सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी केली. गुरुवारी मराठी चित्रपट निर्माते, मल्टिप्लेक्सचे मालक आणि तावडे यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांचे १२४ शो दाखवण्याचा याआधीचा नियम होता. मात्र, मुख्य वेळेत (प्राइम टाइम) हे चित्रपट दाखवले जात नव्हते. यामुळे या सिनेमांना मोठा प्रेक्षक वर्ग मिळत नव्हता. सकाळी ८ ते १२ या वेळ या चित्रपटांना दिला जात होता, त्या वेळी प्रेक्षक फिरकत नसल्याची मराठी निर्मात्यांची तक्रार होती. दरम्यान, या विषयावर विविध चित्रपट निर्माते, कलाकारांच्या संघटनांनी अनेक वेळा सरकारकडे पाठपुरावा केला. मात्र सरकारी निर्णयानंतरही मल्टीप्लेक्स चालक मराठी चित्रपटांना दाद देत नव्हेत. या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारने नुकताच महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

दरम्यान, आयनॉक्स, सिटी प्राइड, पीव्हीआर मल्टिप्लेक्सचे मालक यांच्यासह निर्माते महेश कोठारे, चंद्रकांत देसाई, मराठी चित्रपट महामंडळ विजय पाटकर यांची गुरूवारी तावडे यांच्या कार्यालयात बैठक झाली. या वेळी चार सदस्यांच्या एका समितीची नियुक्ती करण्यात आली. ही समिती कुठल्या सिनेमांना प्राइम टाइममध्ये कुठला वेळ दिला जावा, याचा निर्णय घेईल. या समितीत दोन निर्माते व दोन मल्टिप्लेक्स मालकांचा समावेश असेल. मराठी चित्रपट निर्मात्यांच्या मते दुपारी १२ ते ५ या वेळेत युवक सिनेमे पाहणे पसंत करतात, तर ३ ते ६ वेळेत महिला सिनेमा पाहण्यास पसंती देतात. ६ ते ९ या वेळेत कौटुंबिक चित्रपट पाहण्यावर भर असतो. आता कुठल्या वेळेत कोणते मराठी सिनेमे दाखवावे, याचा निर्णय समिती घेईल, असे तावडे यांनी स्पष्ट केले.

तावडे म्हणतात, ‘मैं हूं ना...’
मल्टिप्लेक्समध्ये प्राईम टाईममध्ये मराठी चित्रपट दाखवण्याचे बंधन राज्य सरकारने चालकांना केले आहे. मात्र मालकांनी हा नियम पाळला नाही, तर काय कारवाई करणार, असे तावडे यांना विचारले असता ‘मराठी चित्रपटांना मदत करण्यासाठी मी आहे ना’, असे वेळ मारणारे उत्तर त्यांनी दिले.