आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाैरंगाबादेतील प्रकरण: शिक्षक नियुक्ती घोटाळ्यात फौजदारी गुन्हे दाखल करू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - औरंगाबाद शिक्षण उपसंचालक कार्यालयात आरक्षण डावलून केलेल्या शिक्षकांच्या नियुक्त्यांप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी साेमवारी विधानसभेत एका लक्षवेधीच्या उत्तरादरम्यान दिली. या चौकशीसाठी स्थानिक आमदारांची बैठक घेऊन विशेष चौकशी समिती नेमण्याचेही शिक्षणमंत्र्यांनी आपल्या उत्तरात मान्य केले. तसेच या प्रकरणी तत्कालीन उपसंचालक सुखदेव डेरे यांच्या निलंबनाचीही माहिती तावडे यांनी दिली.
औरंगाबाद शिक्षण उपसंचालक कार्यालयात झालेल्या बेकायदा शिक्षक नेमणुका व त्यात झालेल्या घोटाळ्याप्रकरणी साेमवारी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडण्यात आली. संजय शिरसाट, संदिपान भुमरे, सुभाष साबणे व अर्जुन खोतकर यांनी या लक्षवेधीद्वारे घोटाळ्यातील कारवाईविषयी विचारणा केली. या घोटाळ्यात शिक्षण खात्यातील अनेक अधिकारी गुंतले असून आरक्षण डावलल्यामुळे पात्र उमेदवारांवर अन्याय झाल्याचे सांगत डेरे यांच्यासह विभागीय शिक्षण उपसंचालक सुधाकर बनाटे यांच्याबद्दलही तक्रारी असल्याची बाब शिक्षणमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच सहायक संचालक कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी हेदेखील या घोटाळ्यात सामील असल्याचा दावा या सदस्यांनी केला. तसेच या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत चौकशीची मागणी संजय शिरसाट यांनी केली.

सुखदेव ढेरे निलंबित
या लक्षवेधीला उत्तर देताना शिक्षणमंत्री विनोद तावडे म्हणाले की, सुखदेव डेरे यांना १ एप्रिल रोजी निलंबित करण्यात आले असून नागपूरचे विभागीय अध्यक्ष एस.एम.गणोरकर यांच्यामार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी शिक्षण आयुक्तांमार्फत तपासणी करण्यात येत असून तक्रारींमध्ये तथ्य आढळल्यास पोलिसांत गुन्हा दाखल केला जाईल, असेही ते म्हणाले.