आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंचनाचे भूत ‘राष्ट्रवादी’ला सोडणार नाही! विनोद तावडे यांचा घणाघात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- काही झाले तरी राष्ट्रवादीला विधिमंडळात सिंचन भ्रष्टाचारावर चर्चा घडू द्यायची नव्हती. ती चर्चा रोखण्यासाठीच दिवाकर रावते यांचे निलंबन घडवून आणले आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी शुक्रवारी केला. ‘सिंचनाचे भूत राष्ट्रवादीचा पिच्छा सोडणार नाही,’ असा इशाराही त्यांनी पत्रकार परिषदेत दिला.

सिंचन भ्रष्टाचराबाबत आमच्याकडे नवे पुरावे आहेत. श्वेतपत्रिकेबाबतही आमचे काही आक्षेप आहेत. त्यामुळे 260 अन्वये चर्चेचा प्रस्ताव आम्ही दाखल केला होता. मात्र, ही चर्चा रोखायचीच असा चंग राष्ट्रवादीने बांधला होता. त्यामुळेच न्यायप्रविष्टतेचे कारण पुढे करत चर्चा अडवल्याचा आरोप तावडे यांनी केला. सभापतींच्या दालनात यावर आम्ही मार्ग काढण्यासाठी गेलो असता त्यांनी दोन्ही बाजूंनी गोंधळ घातल्याचे सांगितले. आम्ही शांत होतो, ते पत्रकारांना विचारा. चित्रफीत पाहा, असे सांगूनही त्यांनी मान्य केले नाही, असा आरोप तावडे यांनी केला.
सरकारच्या भ्रष्ट कारभारावर विरोधकांनी बोलायचे नाही, मग आम्ही काय सरकारच्या अभिनंदाचा प्रस्ताव मांडायचा काय, असा उपरोधिक सवाल करत आजचा काळा दिवस असल्याचे तावडे म्हणाले.

सभापतींवर अविश्वास येणार
आम्ही सभापतींवर दाखल केलेला अविश्वास प्रस्ताव 14 दिवसांनंतर सभागृहात येईल. दहा सदस्यांनी त्याला समर्थन द्यायला हवे. त्यानंतर एका आठवड्यात त्यावर चर्चा करावी लागते, असे सांगून त्यासाठी विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी राज्यपालांना करणार असल्याचे तावडे म्हणाले.

राणे राष्ट्रवादीच्या मदतीला
उद्योगमंत्री नारायण राणे यांनी नवा मुद्दा पुढे करून चर्चा होऊ दिली नाही. त्यांना उद्योग खात्यातील विधेयक चर्चेशिवाय बिनबोभाट मंजूर करून घ्यायचे होते. म्हणून राणे यांनी राष्ट्रवादीला पाठिंबा देत चर्चा उधळून लावली, असा आरोप तावडे यांनी केला.