आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंब्य्रात विश्वरूपमचा खेळ बंद पाडला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई -अभिनेते कमल हासन यांच्या ‘विश्वरूपम’ या चित्रपटावरून देशभरात रणकंदन सुरू असतानाच शुक्रवारी हा चित्रपट महाराष्‍ट्रात प्रदर्शित करण्यात आला. मात्र, मुंब्य्रात काही संघटनांच्या विरोधानंतर तेथील चित्रपटगृहांत शो रद्द करण्यात आले.

विशेष म्हणजे, राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच विश्वरूपमला संरक्षण देण्याचे जाहीर केले होते. शुक्रवारी मुंब्य्रातील आलिशान असलेल्या एका चित्रपटगृहात विश्वरूपमचे पोस्टर लावण्यात आले होते. मात्र, या चित्रपटाचा खेळ बंद करावा, अशी मागणी जमाते मुस्लिम, जैमुतुलम मुस्लिम या संघटनांनी केली. यानंतर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चित्रपटगृहाचे व्यवस्थापक शेख महंमद हुसेन यांना चित्रपटामुळे मुंब्य्रातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते, याची माहिती दिली. त्यानंतर विश्वरूपमचा खेळ बंद करण्यात आला.
या घटनेचे वृत्त कळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी चित्रपटगृहाला सुरक्षा पुरवली. मात्र, त्यानंतर दिवसभरात एकही खेळ झाला नसल्याचे वितरकांनी सांगितले.

महाराष्ट्रात सुरू राहणार : मुख्यमंत्री
‘विश्वरूपम’ चित्रपटाबाबत तामिळनाडूमध्ये वाद सुरू असला तरी महाराष्ट्रामध्ये त्याच्या प्रदर्शनात अडथळे निर्माण होऊ देणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले. मात्र, न्यायालायने या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत काही निर्णय दिल्यास तो पाळावा लागेल, असेही ते म्हणाले. ‘विश्वरूपम’ मुंबईसह महाराष्ट्रामध्ये शुक्रवारी प्रदर्शित झाला अनुचित प्रकार घडू नये म्हणून चित्रपटगृहांमध्ये चोख पोलिस सुरक्षा ठेवण्यात आली होती.