आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vishwas Nagare Patil Article About Crime, Divya Marathi

बांधाच्या वांध्यापासून हॅकिंगपर्यंत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुन्हेगारी दोन स्वरूपाची असते. पूर्वी पोलिस दप्तरी नोंद होणा-या गुन्ह्यांत बहुतांशी शेती, संपत्तीशी संबंधित असायचे. बांधाला बांध आल्यामुळे होणारे वाद आणि त्यातून रक्ताचे पाट वाहण्याचे प्रकार महाराष्‍ट्रच नव्हे तर देशाने बघितले आहेत.

गुन्हेगारी जगताने अनेक स्थित्यंतरे बघितली आहेत. गुन्हेगारी दोन स्वरूपाची असते. एक शरीराशी संबंधित गुन्हे, तर दुसरे मालमत्तेशी संबंधित. पूर्वी पोलिस दप्तरी नोंद होणा-या गुन्ह्यांत बहुतांशी शेती, संपत्तीशी संबंधित असायचे. बांधाला बांध आल्यामुळे होणारे वाद आणि त्यातून रक्ताचे पाट वाहण्याचे प्रकार महाराष्‍ट्रच नव्हे, तर देशाने बघितले आहेत. चोरी, पाकीटमारी, बलात्कार, विनयभंग आणि अपहरणाच्या घटनाही घडायच्या; पण वाढती लोकसंख्या, वाढते शहरीकरण आणि दररोज विकसित होत जाणा-या तंत्रज्ञानाचा गुन्हेगारी जगतावरही परिणाम पडलाय.

नव्वदीचा काळ हा शहरी आणि ग्रामीण भागातील अंतर दूर करणारा होता. मोठ्या प्रमाणावर शहरीकरण होत गेले. शहरातील लोकसंख्याही झपाट्याने वाढत गेली. यामुळे शहरी भागातील वाईट ट्रेंड ग्रामीण भागातही शिरले. याचा सर्वाधिक फटका सेमी अर्बन स्वरूपातील शहरांना आजही बसतोय. 1990 नंतर दहशतवादी कृत्यांनी हातपाय पसरले. मुंबईवरील 26/11 चा दहशतवादी हल्ला या गुन्ह्याचा कळस ठरला. राज्याच्या काही भागात नक्षलवादी तसेच जातीय गुन्ह्यांचाही मोठा धोका आहे. भेसळीच्या गुन्ह्यांचेही मोठे चॅलेंज आहे.

सत्तरीपासूनच दम मारो दम संस्कृती तरुण पिढीला बरबाद करत आहे. गेल्या वर्षात मुंबईत 5.10 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. श्रीमंत मुलांमधील वाढत्या रेव्ह पार्ट्यांचे आव्हानही पोलिस दलाला पेलावे लागणार आहे. रॅडिकल ऑडिओ व्हिडिओ इमोशन्स प्रकारातील या पार्ट्यांत मोठ्या प्रमाणात स्टिम्युलेटर्स, कोकेन, हेरॉइन अशा अमली पदार्थांचे सेवन केले जाते. सुदैवाने आपल्याकडे केवळ महानगरातच हा ट्रेंड दिसून येतोय. आपले संस्कार आणि कुटुंब पद्धती हेच याचे कारण म्हणता येईल.

गेल्या दशकात सायबर गुन्हेगारीने तपास यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. पूर्वी दरोडा टाकून बँका लुटल्या जात; पण आता संगणकाचे एक बटण दाबताच कोट्यवधी रुपये एका खात्यातून दुस-या खात्यात वळते होतात. एखाद्या कार्यालयाची वेबसाइट हॅक करून त्यावरील गोपनीय माहितीही चोरली जाते. इंटरनेट, मोबाइलमुळे गुन्हेगारी जगताला नवीन वळण मिळाले आहे. पोलिस दलातही सकारात्मक बदल होत आहेत. 26/11 च्या हल्ल्यानंतर मुंबईत 20 बॉम्ब डिटेक्शन स्क्वॉड तयार करण्यात आले. या हल्ल्यापूर्वी आपले पोलिस दंडुक्यांनी लढायचे. आता ते हातात एक-47, एमपी 5, एमपी 9 सारख्या शस्त्रांचा वापर करतायत. केंद्राच्या धर्तीवर स्टेट इंटेलिजन्स विंग सुरू झाली. 5 वर्षांत 55 हजार पोलिसांची भरती झाली. सायबर सेल तयार झाले. सायबर कायदे तयार करण्यात आले. असे असले तरी पोलिस कर्मचा-यांना पुरेसे प्रशिक्षण मिळत नाहीय. संशोधनाचा अभाव आहे. माहिती तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे सोशल नेटवर्किंग साइट्सच्या माध्यमातून चांगल्या, सकारात्मक बाबी पसरवल्या, तर एक चांगला सशक्त आणि भयमुक्त समाज तयार होऊ शकेल.

(लेखक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपमहानिरीक्षक आहेत.)