आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vishwas Patil Comment On Declassification Of Netaji Files

सत्तेवर पकड ठेवण्यासाठी नेहरूंची नेताजींवर पाळत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - तब्बल वीस वर्षे म्हणजे १९४८ ते १९६८ या काळात जवाहरलाल नेहरू यांनी नेताजींच्या कुटुंबीयांबाबत सातत्याने हेरगिरी केली असल्याचे गुप्तचर खात्याच्या दोन डिक्लासिफाइड फाइल्समधून निष्पन्न झाल्याचा दावा "मेल टुडे'' या इंग्लंडमधील इंग्रजी दैनिकाने केला आहे. यासंदर्भात ‘महानायक’ ही सुभाषचंद्र बोस यांच्यावर कादंबरी लिहिणारे प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांच्याशी ‘दिव्य मराठी’ने केलेली बातचीत...

नेहरू यांनी सुभाषबाबूंची हेरगिरी केली होती यात कितपत तथ्य आहे? : सुभाषबाबू जिवंत आहेत की काय ही शंका नेहरूंना होती. ते जिवंत असतील नि परत आले, तर आपल्याला निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागेल याची नेहरूंना भीती होती. सुभाषबाबू काँग्रेसमध्ये असताना त्रिपुरी काँग्रेसमध्ये जी निवडणूक झाली त्या वेळी पट्टाभी सीतारामय्या निवडणुकीसाठी उभे होते. स्वत: महात्मा गांधी यांनी मी निवडणुकीला उभा आहे असे समजून सीतारामय्या यांना मते द्या, असे आवाहन करूनही सीतारामय्या यांना १३७५, तर सुभाषबाबूंना १५८५ मते पडली होती. याशिवाय त्या काळच्या युनायटेड प्रॉव्हिन्स म्हणजे सध्याच्या उत्तर प्रदेशात, म्हणजेच नेहरूंच्या स्वत:च्या गृहराज्यात सीतारामय्या यांना १८५ मते मिळाली, तर सुभाषबाबू यांनी २६० मते मिळवत विजय संपादन केला होता. त्या वेळी गांधीजींनी नेहरूंना खडसावले होते की तुमच्या हक्काच्या प्रदेशातही सुभाषबाबू कसे काय जिंकू शकतात? खरे तर गांधीजींपेक्षाही सुभाषबाबूंविराेधातल्या विचारांची पेरणी लॉर्ड माउंटबॅटन यांनी नेहरूंच्या मनात केली होती.

हेरगिरीकेली याला पुरावा काय? : संपूर्णनेहरू वाङ‌्मयाचे जे अनेक खंड प्रकाशित करण्यात आलेले आहेत, त्या वाङ‌्मयाच्या दुसर्‍या मालिकेत नेहरूंनी त्या वेळी देशातील प्रत्येक राज्यपालांना लिहिलेली पत्रे आहेत. ही पत्रे उपलब्ध आहेत. त्यात त्यांनी म्हटलेलं आहे की, आझाद हिंद सेनेतील जवानांना सरकारी नोकरीत घ्या; पण त्यांच्यावर सुरक्षेसंदर्भात कोणतीही जबाबदारी देऊ नका. ते संघटित होणार नाहीत, याची खबरदारी घ्या. याचा अर्थ असा की, स्वातंत्र्यानंतर सत्ताधार्‍यांना वेळोवेळी नेताजींची भीती वाटत होती. मी वर उल्लेखलेले प्रसंगदेखील या वाङ्मयात उपलब्ध आहेत. वास्तविक नेहरूंना फॅसिझमची भीती वाटत नव्हती, तर त्यांना नेताजींच्या बलदंड व्यक्तिमत्त्वाची धास्ती वाटत होती. कदाचित नेताजी परत आले, तर देशातील बहुतांश जनता त्यांच्या पाठीशी उभी राहील, ही शक्यता त्यामागे होती. १९४६ मध्ये सिंगापूर येथे नेताजींच्या सहकार्‍यांनी एक स्मारक बांधले होते.

सिंगापूर ताब्यात घेताना माउंटबॅटन यांनी डायनामाइटने ते उडवून दिले; पण ते पुन्हा उभारण्यात आले. १९४६ च्या दरम्यान नेहरू खास या स्मारकाचे उद्घाटन करण्यासाठी सिंगापूरला गेले होते. त्या वेळचे बर्मा एरिया आर्मीचे (नंतर ते शेवटचे गव्हर्नर जनरल झालेले) प्रमुख लष्करी कमांडर माउंटबॅटन यांनी नेहरूंना निरोप दिला की, अगोदर माझी भेट घ्या. तेव्हा नेहरू आणि माउंटबॅटन या दोघांमध्ये जी खासगी चर्चा झाली, त्यामध्ये मुत्सद्दी माउंटबॅटनने नेहरूंना त्यांच्या भविष्यातल्या धोक्याची जाणीव करून दिली. "सुभाषचंद्रांचा प्रमाणाबाहेर गौरव करण्याच्या फंदात पडू नका. ‘सुभाषीझम’ तुम्हाला भविष्यात अडचणीचा ठरू शकतो. तुम्ही त्यांना एवढे महत्त्व देऊ नका, तिकडे जाऊ नका,’ असे म्हटले. त्यानंतर नेहरू कार्यक्रमाला गेले नाहीत; पण रात्री नेहरूंना झोप येईना. त्यांनी रात्रीच दीड-दोन वाजता जाऊन त्या समुद्रकाठावर स्मारकाचे दर्शन घेतले. हे संपूर्ण कथानक कपोलकल्पित नसून नेहरूंनी स्वत: मौलाना आझाद यांना लिहिलेल्या सहापानी पत्रात त्या घटनेचा उल्लेख केला. एखाद्या नाटकात किंवा कादंबरीमध्ये शोभावा, असा हा तपशील आहे; पण ही घटना मला कॅप्टन लक्ष्मी यांनी स्वत: तर सांगितलीच शिवाय हा प्रसंग स्वत: नेहरू यांनी लिहून ठेवला आहे. नेहरूंचे संपूर्ण वाङ््मय नेहरू मेमाेरियलने प्रकाशित केले आहे. त्यामुळे त्यातील सत्याबाबत शंका घ्यायला जागाच नाही.

केवळ सत्ता जाण्याच्या भीतीपोटी नेहरूंनी नेताजींची हेरगिरी केली असेल?
गांधीजी, नेहरू आणि सुभाषबाबू या तिघांचे नाते म्हणजे शेक्सपिअरच्या शोकांतिकेसारखे आहे, असे स्वत: नेहरू यांनीच एके ठिकाणी लिहून ठेवले आहे. नेहरूंनी ज्या तऱ्हेने निवडणूक जिंकण्याकरता वा सत्ता हाती येण्याकरता सुभाषबाबूंच्या बाबतीत धोरणे आखली, जी मी वरील प्रश्नांना उत्तरे देताना सांगितली, तीच पुरावे आहेत असे आपण म्हणू शकतो. नेहरूंवर सुभाषबाबूंचे प्रचंड दडपण होते. त्यांनी स्वत: आझाद हिंद सेनेसाठी दिल्लीत त्यांच्याविरोधात खटला दाखल झाला असता सेनेचे वकीलपत्र घेतले असले, तरी माउंटबॅटन यांनी सुभाषबाबूंना जास्त महत्त्व देऊन त्यांना मोठे करू नका, असे विचार पुढे पेरल्याने नेहरूंनी निवडणुकीतील आगामी नुकसानाची भीती लक्षात घेत हेरगिरी केली, असे म्हणायला नक्कीच जागा आहे.