आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाइन पीत घ्या मुंबई दर्शन; नाशिकची सहलही!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - देशोदेशीच्या पर्यटकांना मुंबई व महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांकडे आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) विशेष उपाययोजना आखत आहे. मे महिन्यापासून मुंबईत एसी बसद्वारे मुंबई दर्शनाच्या सहली ठेवण्यात येणार असून यात पर्यटकांना वाइन पिण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. वाइन उद्योगवाढीसाठी पर्यटकांना नाशिक येथील वायनरींची सहलही घडवून आणण्यात येणार आहेत. वाइन पीत मुंबई दर्शनसाठी विशेष परवानगी लागणार असून, त्यची प्रक्रिया सुरू केल्याचे एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक पराग जैन नैनुतिया म्हणाले.

देशात सर्वाधिक वाइननिर्मिती महाराष्ट्रात होते. उत्कृष्ट दर्जाची वाइन असूनही त्याचा म्हणावा तसा खप होत नाही. परदेशात ती प्रचंड लोकप्रिय आहे. देशातही ती लोकप्रिय करण्याचा एमटीडीसीचा विचार होता. त्यातूनच मुंबई दर्शन बसमध्ये वाइन देण्याची कल्पना पुढे आली. बेस्टच्या सहकार्याने मुंबईत एसी बसद्वारे अशा मुंबई दर्शन सहली ठेवण्यात येणार आहेत, असे जैन म्हणाले. नाशिक येथील वायनरीमध्येही पर्यटकांना नेण्याचा विचार आहे. यासाठी एकदिवसीय वा मुक्कामी सहली आयोजित करणार आहोत. नाशिकमधील वायनरी कंपन्यांशी बोलणी सुरू असून पर्यटकांना द्राक्षांच्या बागा दाखवून त्यापासून वाईन कशी तयार होते हे दाखवले जाणार आहे. यासाठी किती शुल्क आकारायचे हे अजून ठरलेले नाही. मात्र, पुढील आठवड्यात ही योजना अंतिम रूप घेईल आणि मे महिन्यापासून सहली सुरू होतील, असेही जैन यांनी सांगितले.बेस्टचे महासंचालक जगदीश पाटील यांनी सांगितले, बेस्टच्या ताफ्यात एसी बस असून मार्केटिंग व व्यवस्थापन एमटीडीसीचे राहील. पर्यटन शुल्क व अन्य बाबींबाबत पुढील आठवड्यात बैठक असून त्यानंतर योजना आणली जाईल.
मुंबई दर्शनचे ५०० रुपये तिकीट
मुंबई दर्शनसाठी उत्तर व साऊथ मुंबई अशा दोन सहली असतील. यासाठी ५०० रुपये शुल्क आकारण्याचा विचार आहे. यात प्रवेश फी व वाइनचे शुल्क समाविष्ट नाहीत. १२ ते १४ तासांच्या सहलीत मंदिरेही दाखवण्यात येतील. या पर्यटकांना रांग लावावी लागणार नाही.

बसमध्येच मद्य परवाना
पर्यटनस्थळांच्या अधिकाऱ्यांशी सहलीत सहभागाबाबत बोलणी सुरू असून सोमवारी यावर एक बैठक होणार आहे. शिवाय वाइन पिण्यासाठी मद्य परवाना आवश्यक असल्याने इच्छुक पर्यटकांना बसमध्येच एक दिवसाचा परवाना देण्यात येणार आहे.