आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकाच दिवशी मतमोजणी अडचणीत, पुरेशी मतदान यंत्रे नसल्याने आयोग हतबल

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्यातील 27 जिल्हा परिषदा व 10 महापालिकांच्या निवडणुकांची मतमोजणी एकाचवेळी होण्यासाठी लागणारी मतदान यंत्रे पुरेशा संख्येने अद्यापही उपलब्ध नसल्याने ही प्रक्रिया अडचणीची ठरत आहे. 21 जानेवारीपर्यंत आणखी काही मतदान यंत्रांची व्यवस्था होते का, ते पाहून निर्णय घेण्यात येईल, असे राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी सोमवारी सांगितले.
जिल्हा परिषदांसाठी 66 हजार आणि महापालिकांसाठी 25 हजार यंत्रे लागतात. त्यापैकी 24 हजार यंत्रे उपलब्ध होत असून 40 हजार यंत्रे आणखी हवी आहेत. निवडणूक आयोगाच्या अधिकाºयांनी केंद्र सरकारच्या हैदराबाद येथील संस्थेला भेट देऊन नवीन यंत्रांची मागणी केली. मात्र ती गरजेएवढी यंत्रे उपलब्ध नाहीत. त्यामुळे 21 जानेवारीपर्यंत यंत्रे मिळतात का याचा अंदाज घेऊनच मतमोजणीविषयी निर्णय घेतला जाईल, असे त्या म्हणाल्या.
मतदान यंत्रे तपासण्यासाठी अधिक तंत्रज्ञ हवे असल्याची मागणीही त्यांनी केंद्राकडे केली आहे. तसेच जिल्हा परिषदा आणि महापालिकेच्या निवडणुकांसाठी 37 निरीक्षकांची गरज असून देशातल्या अन्य राज्यांमध्येही त्यावेळी निवडणुका आहेत. तरीही आयएएस दर्जाचे 37 अधिकारी उपलब्ध होऊ शकतील, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, जात पडताळणी प्रमाणपत्र असलेल्या इच्छुकांना 18 जानेवारीपासून उमेदवारी अर्जांचे वाटप करण्यात येणार आहे. राज्य सरकारने जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याबाबत काही निर्णय घेतला होता व त्यावर न्यायालयाने निकालही दिला आहे. मात्र तो अद्याप प्राप्त झाला नसल्याने त्यावर भाष्य करणार नसल्याचे त्या म्हणाल्या.
सुरक्षेबाबत आढावा: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी सुरक्षा व्यवस्था चोख राहावी म्हणून सत्यनारायण यांनी विशेष बैठक बोलावली होती. या बैठकीला महापालिका आयुक्त सुबोध कुमार, मुंबईचे पोलीस आयुक्त अरुप पटनाईक, जिल्हाधिकारी व इतर अधिकारी उपस्थित होते. मात्र सुबोध कुमार आणि पटनाईक यांनी सुरक्षेबाबतचे सादरीकरण न केल्याने याबाबतची बैठक पुन्हा 21 जानेवारीला घेण्यात येणार आहे. सत्यनारायण यांनी यावेळी मुंबईतील संवेदनशील भागांबाबत चर्चा केली.