आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Waman Kendre Is Appointed As The New Director Of National School Of Drama (NSD).

यांनी मराठवाड्याच्या एका खेड्यातून सुरु केलेला प्रवास पोहोचला 'एनएसडी' पर्यंत...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाड्यातील एका खेड्यापासून सुरू झालेला वामन केंद्रे यांचा प्रवास राष्ट्रीय स्तरावरील एकमेव नाट्यप्रशिक्षण शाळेपर्यंत, म्हणजे ‘एनएसडी’च्या संचालकपदापर्यंत पोहोचला आहे. नाटक शिकून ही कला पुढे नेणे, ही त्यांची तळमळ होती. या दुर्दम्य इच्छाशक्तीवरच त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये विद्यार्थी म्हणून प्रवेश मिळवला. आज त्याच संस्थेच्या संचालकपदावर ते विराजमान झाले आहेत. पाच वर्षांसाठी ही जबाबदारी पेलताना त्यांच्या योजना आणि संकल्पांबाबत ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधी नम्रता भिंगार्डे यांनी वामन केंद्रे यांच्याशी दिलखुलास गप्पा मारल्या..


0 ‘एनएसडी डायरेक्टर वामन केंद्रे’ अशी पाटी तयार झाली असेल एव्हाना. आता पाच वर्षांचा सत्ताकाळ कसा घालवण्याचा विचार आहे?

त्या संस्थेत ‘नॅशनल’ नावाचा शब्द फार महत्त्वाचा आहे. ती राष्ट्रीय स्तरावरची एकमेव नाट्यप्रशिक्षण शाळा आहे. मात्र, तिला खर्‍या अर्थाने राष्ट्रीय स्तरावर नेण्याची गरज आहे. कारण शहरांत, गावागावांत विविध कलाकृतींना जन्म देणार्‍या कलावंतांमध्ये एनएसडी ‘माझी’ आहे, ही भावना निर्माण करण्याची फार मोठी गरज आहे. त्यासाठी मुळात एनएसडीच्या अँक्टिव्हिटीजचा परिणाम सर्वदूर पसरावा लागतो. कोणतीही नाट्यशाळा रंगकर्मीला दिशा देण्याचं काम करीत असते. धडपडणार्‍या सर्वांनाच ती ‘आयडियल’ नाटक म्हणजे काय हे दाखवण्याचं आणि त्याद्वारे शिक्षण देत असते. त्याची सौंदर्यात्मक अनुभूती समजावण्याचा प्रयत्न करत असते. त्याचबरोबर विविध शैली हाताळून आपल्याला नाटक कसे करता येईल त्याचं दिशादर्शन करत असते. आजच्या प्रवाहातील नाट्यकलाकृतींकडे पाहण्याची वेगळी दृष्टी देत असते. थोडक्यात, एनएसडी स्वत:च्या विद्यार्थ्यांना शिकवतेच, पण परिसरातल्या रंगकर्मींवरही ती परिणाम करते. असा परिणाम राष्ट्रीय स्तरावर साधण्याची जबाबदारी आता माझ्यावर आली आहे.

0 नाट्यक्षेत्रात कोणकोणते प्रकल्प राबवण्याची गरज वाटते?

नाटक एक चळवळ म्हणून आकाराला येत होते तेव्हा एनएसडीची स्थापना झाली. नंतर परिस्थितीनुसार नाटकाचे उद्दिष्टही बदलत गेले. मात्र, ‘एनएसडी’ने ती चळवळ कायमस्वरुपी आपल्या विद्यार्थ्यांमध्ये रुजवली. ती चळवळ पुढे चालवणे ही माझी नैतिक जबाबदारी आहे. प्रत्येक प्रकारातील रंगमंचीय अवस्थांना या संस्थेशी कसे जोडता येईल, म्हणजे केवळ थिएटरवाल्यांबरोबरच नाही तर समाजाबरोबरही कसे जोडता येईल याचे विचार माझ्या मनात सुरू झाले आहेत. यासाठी ‘एनएसडी’चे विकेंद्रीकरण करावे लागेल. ही संस्था उदयाला आली तेव्हा ज्या उद्देशाने सर्व राज्यांतील कला एका छत्राखाली आणण्याचे प्रयत्न झाले, तसे प्रत्येक राज्यात झाले पाहिजेत. सध्या रंगभूमी, टेलिव्हिजन, चित्रपट या माध्यमांमुळे कला क्षेत्रात काम करणार्‍यांची संख्या विलक्षण वाढून एक चळवळ उभी राहिली आहे. त्यात हजारो लोकांना रोजगार मिळाला आहे. त्यामुळे सर्वदूर राष्ट्रीय प्रशिक्षण शाळेचा प्रभाव पाडण्यासाठी या संस्थेमार्फत आपल्याला काय करता येईल, हे पाहण्याची गरज आहे. रिजनल ड्रामा स्कूल स्थापून त्या त्या भाषेत त्या त्या कलाकृतींना अधिक शिक्षित केले पाहिजे.

0 एनएसडीच्या विद्यार्थ्यांना मराठी कलाकारांविषयी खोलवर माहिती व्हावी यासाठी काय करणार?

नाट्यकलेत ज्याला पारंगत व्हायचे आहे त्याला सर्व रंगकर्मी, मग ते कोणत्याही भाषेचे असोत, माहीत असतात. अनेकदा बंगाली, नॉर्थ, साऊथच्या कलाकारांचा तिथल्या विद्यार्थ्यांवर पगडा असतो, असे काही पासआऊट विद्यार्थी बोलतात, पण ते खरे नाही. ज्या रंगभूमीच्या संस्कृतीकडून उभ्या देशाने धडे घ्यावेत, अशा मराठी रंगभूमीचा सुवास मी घेऊन तिथे जात आहे. तेव्हा मराठी कलाकारांचे मोठेपण तिथल्या विद्यार्थ्यांना समजावणे हे माझे कामच आहे. परंतु एकाच संस्कृतीतला कुरवाळत बसलो तर राष्ट्रीय शाळा मला चालवता येणार नाही. देशातील प्रत्येक संस्कृतीच्या मृदगंधाचा सहवास विद्यार्थ्यांना मिळेल असे प्रयत्न मी करणार आहे. या सर्व संस्कृतींचे संचित आणि आधुनिक नाट्यचळवळीचे धागेदोरे घेऊन नाटक उभे राहील तेव्हा ते केवळ एका संस्कृतीचे नाही, तर भारतीय नाटक ठरेल. जगातील नाटक मुलांना शिकवणंही तितकच महत्त्वाचे आहे. पारंपरिक आणि आधुनिक गोष्टींना एकत्र करून समाजाशी कनेक्ट करणारी नाट्यप्रशिक्षणाची शाळा प्रत्येकाला कशी उपलब्ध करून देता येईल, याबद्दल विचार करण्याची गरज मला वाटते.

0 या संस्थेतली नाटके म्हणजे केवळ ‘क्लासेससाठीच असा एक समज पसरला आहे. क्लासेस आणि मासेस यातील दरी दूर कशी करणार?

एनएसडीत होणारी नाटके बहुतांशी एका प्रेरणेतून, विचारधारेतून आणि एका संस्कृतीतून आलेली असतात. त्यामुळे बरीच नाटके क्लासेससाठीचा अदृश्य बोर्ड घेऊनच येतात. मात्र, आम्ही नाटक सर्वच प्रेक्षकांसाठी बनवतो. त्यामुळे क्लासेस आणि मासेसचा हा पुसटसा गैरसमज दूर करून एका नव्या पद्धतीने विद्यार्थी घडवण्यास मी सुरुवात करणार आहे. शेवटी नाटक घेऊन आपल्याला समाजापुढे जायचे आहे. समाजाच्या विवंचना, दु:खे, आनंद समजला नाही, तर नाटक कशाच्या बळावर करणार आहोत?

0 मराठी लोकसंस्कृतीवर तुमची पकड आहे. एनएसडीत सर्व भाषांतील राज्यांतील कलाप्रकारांची सांगड कशी घालणार?

संस्कृतींचा भेद करण्यापेक्षा भारतीय आणि पाश्चात्य असे वर्गीकरण करू या. संस्कृतींची सांगड घालता येणे हाच मुळात कोणत्याही कलेचा गाभा असतो. जगातलं नाटक शिकवणं हा त्या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. आपले आणि जगातले उत्तम शिकवण्याचे काम या शाळेतून आम्ही करू. विद्यार्थी शिकून आपापल्या पद्धतीने त्यांची सांगड घालतो, याची अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. त्याचसाठी जर प्रत्येक राज्यात एनएसडीची शाखा स्थापन होऊ शकली, तर प्रत्येक कलाकार प्रशिक्षणाच्या छायेखाली येईल आणि सांस्कृतिकदृष्ट्या आपण आणखी प्रगती करू शकू.

0 कोणकोणत्या मुद्दय़ांवर ठळकपणे कृती करणार?

एखाद्या मुलाला नाट्याचे अँडव्हान्स प्रशिक्षण घेण्याची इच्छा झाली, तर आपल्या देशात ती सोय नाही. त्यामुळे एनएसडीला स्पेशलाइज्ड एज्युकेशन ट्रेनिंग सेंटर बनवण्याची गरज आहे आणि तो प्रकल्पही डोक्यात आहे. आता जे विषय नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये शिकवले जातात त्याव्यतिरिक्त वेगळे विषय शिक्षणात आणणे गरजेचे आहे. म्हणजेच नाट्यलेखन मराठी, बंगाली अशा नाट्यसंस्कृतीत आहे, मात्र इतर भाषांमध्ये ती परंपराच नाही. त्यामुळे नवीन नाटक लिहिण्याचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे. नाटक शिकवणे हीसुद्धा एक कला आहे. तेव्हा नाटक शिकवणार्‍यांसाठीही एखादे खास सेशन घ्यावे लागेल. कला प्रशासनाविषयीही विचार झालेला नाही. ज्याप्रमाणे आयएएस अधिकार्‍याला प्रशासन शिकवले जाते, तसेच संबंधित अधिकार्‍याला कलेच्या प्रशासनाचे धडे देता येतील, अशी सोय करण्याचाही विचार सुरू आहे. एखादा विद्यार्थी एनएसडीमधून पास होऊन जगाच्या प्रयोगशाळेत गेला की, तो कोणत्याही माध्यमात लीलया काम करू शकेल, असे कौशल्य त्याच्यात आणता यावे या दृष्टीनेही मी प्रयत्न करणार आहे.

0 एनएसडीचा विद्यार्थी ते एनएसडीचा संचालक प्रवास थरारक आहे?

मी जेव्हा एनएसडीत विद्यार्थी होतो तेव्हा बी. व्ही. कारन्थ हे माझे गुरू होते. इब्राहम अल्काझी यांचाही सहवास मला मिळाला. तेव्हा विद्यार्थी म्हणून जेव्हा एनएसडीत वावरलो तेव्हा मी बुजरा होतो. रंगमंचावरील अपार निष्ठा आणि नवीन काही शिकण्याची ओढ या एवढय़ाच भांडवलावर मी तिथे गेलो होतो. आज या नामवंत संस्थेच्या संचालकपदी पोहोचल्यावर तिथे वावरताना पहिल्यासारखा बुजरेपणा निश्चितच नसेल, परंतु नवीन शिकण्याची ओढ मात्र तशीच राहील.