आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीनशे दुष्काळी गावे पाण्याबाबत ‘अामिर’ करणार; बीड, औरंगाबादसह १३ जिल्ह्यांमध्ये वॉटर कप स्पर्धा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ‘जाेपर्यंत नागरिकांना पाण्याचे महत्त्व समजणार नाही, तोपर्यंत जलसंधारण करणे अशक्य आहे. लोकांना पाणी वापराबाबत प्रशिक्षित करण्याचे काम पाणी फाउंडेशन करत असून यातून जलसेना तयार होत अाहे. त्यामुळे सन २०१९ पर्यंत अापण राज्यातील २० हजार गावे दुष्काळमुक्त करू,’  असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मुंबईत व्यक्त केला. ‘सत्यमेव जयते वॉटर कप २’ स्पर्धेचा शुभारंभ करताना ते बोलत होते. या वेळी आमिर खानच्या पाणी फाउंडेशनवर पुढील वर्षी ३०० तालुके दत्तक घेऊन दुष्काळमुक्त करण्याची जबाबदारीही त्यांनी दिली.  

राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जलयुक्त शिवार योजना सुरू केल्यानंतर याच धर्तीवर लोकसहभागातून जलसंधारण करण्यासाठी आमिर खानने वॉटर कप स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला होता.  गेल्या वर्षी तीन तालुक्यांतील गावांनी १,३६८ कोटी लिटर पाणीसाठ्याची क्षमता निर्माण केली. ज्याचे वार्षिक बाजारमूल्य २७२ कोटी रुपये आहे. या यशाने प्रेरित होऊन अामिरने मंगळवारी वॉटर कप स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याची मंगळवारी घाेषणा केली.  

मुख्यमंत्र्यांनी सांगितले, आमिर खान यांना जलसेवक म्हटले तर अयोग्य ठरणार नाही. वॉटर कप स्पर्धेमुळे जलसंधारणाच्या कामाला एक नवीन आयाम मिळाला आहे. पाणी अडवा पाणी जिरवा योजना अनेक वर्षांपासून ऐकत आलो, परंतु नागरिकांचा सहभागाविना योजना यशस्वी झाली नाही. पाणी साठवण्यासाठी आमिर यांनी लोकांची चळवळ उभी केली नाही तर याला उत्सवाचे रूप दिल्याने ही योजना यशस्वी झाली.’ 
 
आमिर खान म्हणाला, ‘जलयुक्त शिवार योजनेने प्रेरित होऊन आम्ही ही योजना आखली. यंदा आम्ही १३ जिल्ह्यांतील ३० तालुक्यांत ही स्पर्धा राबवणार आहोत. नागरिकांच्या सहभागाबरोबरच कंपन्या आणि सामाजिक संस्था मदत करण्यास पुढे आल्याने यश मिळाले आहे. ‘दंगल’पेक्षा ही याेजना यशस्वी झाल्यास मला 
जास्त अानंद हाेईल.’   

या वेळी वॉटर कप स्पर्धेसाठी नागराज मंजुळे यांनी तयार केलेला म्युझिक व्हिडिओही दाखवण्यात आला. काॅर्पोरेट कंपन्यांचे प्रतिनिधी आणि अजय-अतुल, नागराज मंजुळे, जितेंद्र जोशी, सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, अतुल कुलकर्णीसह अनेक मराठी कलाकारही या वेळी उपस्थित होते.   

या तालुक्यांत हाेणार स्पर्धा  
बीड : अंबाजोगाई, केज, धारूर   
लातूर : औसा, निलंगा   
उस्मानाबाद :  भूम, परंडा, कळंब   
औरंगाबाद : फुलंब्री, खुलताबाद   
सोलापूर : सांगोला, उत्तर सोलापूर   
अकोला : बार्शी-टाकळी, पातूर, अकोट   
वाशीम : कारंजा, वर्धा : आर्वी     
यवतमाळ : राळेगाव, कळंब, उमरखेड   
अमरावती : वरुड, धारणी   
सातारा : कोरेगाव, माण, खटाव   
पुणे : पुरंदर, इंदापूर   
सांगली : खानापूर, आटपाडी, जत  

काय आहे स्पर्धा?  
दुष्काळी गावातील नागरिकांना पाणी कसे साठवावे याचे शास्त्रोक्त प्रशिक्षण पाणी फाउंडेशनमार्फत दिले जाणार आहे. यासाठी गेल्या वेळी भाग घेतलेल्या गावांतील ४० जणांची प्रशिक्षक म्हणून निवड केली अाहे. तसेच सात ते १७ जानेवारीदरम्यान निवडण्यात आलेल्या तालुक्यांतील महाविद्यालयात जाऊन पाणलोटाची माहिती देण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्याला दोन समन्वयक नेमण्यात आले असून ते गाव, सरकारी अधिकारी आणि फाउंडेशनमध्ये समन्वय साधतील.
 
 
बातम्या आणखी आहेत...