मुंबई- जलतज्ज्ञ माधव चितळे यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या विशेष चौकशी समितीचा अहवाल आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सादर करण्यात आला. ही समिती विविध पाटबंधारे विकास महामंडळातील सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रस्ताव, सिंचन क्षमता व सिंचित क्षेत्र यांच्या तपासणीसाठी 31 डिसेंबर 2012 च्या शासन निर्णयानुसार स्थापन करण्यात आली होती.
माधव चितळे यांनी आज मुख्यमंत्र्यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेऊन हा अहवाल दिला. तो दोन खंडात असून 1361 पानी आहे. या अहवालाची सारांश टिपणी (Executive Summery) सादर करण्यासाठी श्री. चितळे यांनी 15 दिवसांची मुदत वाढ देण्याची केलेली विनंती मुख्यमंत्र्यांनी मान्य केली. आज अहवाल सादर करते वेळी समितीचे सदस्य ए. के. डी. जाधव, वि. म. रानडे, कृष्णा लव्हेकर, हे सदस्य उपस्थित होते.
चितळे चौकशी समितीने अहवालाबाबत केलेली संक्षिप्त टिप्पणी खालीलप्रमाणे...
- विशेष चौकशीची मुदत सुरवातीला जून 2013 अखेरपर्यंत होती.
- त्यानंतर या चौकशी समितीला प्रथम 31 डिसेंबर 2013 आणि त्यानंतर 28 फेब्रुवारी 2014 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.
- या समितीच्या एकूण 30 बैठका झाल्या.
- समितीने 19 पाटबंधारे प्रकल्पांना भेटी दिल्या. त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, शासकीय अधिकारी यांच्याशी चर्चा केली.