आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उर्वरित पाणी सोडू नका; नगर-नाशिकची हायकोर्टात मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- जायकवाडी धरणात सोडण्यात येणाऱ्या एकूण १२.८४ टीएमसी पाण्यापैकी आठ टीएमसी पाणी आतापर्यंत सोडण्यात आले असून उर्वरित चार टीएमसी पाणी सोडू नका, ही नवी मागणी आपल्या मूळ याचिकेत समाविष्ट करण्याची विनंती नाशिक आणि अहमदनगरच्या याचिकाकर्त्यांनी केली आहे. तसेच आपल्याला नव्याने युक्तिवाद करण्यासाठी आणखी थोडा कालावधी हवा असल्याची विनंतीही या याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयाला केली. त्यावर नव्याने वेळ हवा असल्यास सर्वोच्च न्यायालयात जा, असा सल्ला उच्च न्यायालयाने दिल्याने याचिकाकर्त्यांची अडचण झाली आहे.

जायकवाडी पाणीवाटपप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बुधवारपासून न्यायमूर्ती अभय अोक आणि न्या. गौतम पटेल यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू झाली आहे. उच्च न्यायालयाने ऑक्टोबर महिन्यात पाणी सोडण्याबाबत दिलेल्या अंतरिम आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेलेल्या याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयापासून अनेक बाबी लपवल्याबद्दल मंगळवारी उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना चांगलेच फैलावर घेतले होते. तसेच या याचिकाकर्त्यांनी कशा पद्धतीने काही बाबी सर्वोच्च न्यायालयापासून लपवल्या आहेत, ते आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊ, अशी भूमिका बुधवारी राज्य सरकारच्या वतीने मांडण्यात आली. बुधवारी आपल्या मूळ याचिकेत काही सुधारणा करण्याबाबत याचिकाकर्त्यांनी विनंती करताच त्यांना परवानगी देत न्यायालयाने पुढील सुनावणी डिसेंबर रोजी ठेवली. मात्र, आपल्याला नव्याने बाजू मांडण्यासाठी पुन्हा तयारी करण्यासाठी अधिक वेळ हवा, अशी भूमिका याचिकाकर्त्यांच्या वतीने घेण्यात आली. त्यावर सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार होत असून अधिक वेळ हवा असल्यास सर्वोच्च न्यायालयात जा, असा सल्ला उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिला आहे.

पाणी वाया घातले; १५ हजारांचा दंड
नाशिक- सातपूर विभागातपाण्याचा अपव्यय करणाऱ्यांकडून पालिकेच्या पथकाने सुमारे १५ हजार रुपयांचा दंड वसूल केला अाहे. विभागीय अधिकारी महेंद्र पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर विभागात पाण्याचा अपव्यय राेखण्यासाठी पथक नेमण्यात अाले अाहे. या पथकाने सातपूर काॅलनी परिसरात नागरिक पिण्याच्या पाण्यानेच गल्लीतील रस्ते धूत असल्याच्या तक्रारी असल्याने नागरिकांकडून १५ हजार रुपयांचा दंड वसूल केला.
नाशिक महापालिकेस पाणीकपातीची चिंता
आधीच दुष्काळत्यातच गंगापूर धरण समूहातच पाणी नसताना जायकवाडीला १.३६ टीएमसी सोडावे लागलेल्या पाण्यामुळे नाशिक मनपाला यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १५६९ दलघनफूट कमी मिळणार आहे. त्यामुळे पाणी अारक्षणाच्या बैठकीत कपातीची शक्यता आहे. मनपाला यंदा वर्षभरासाठी हजार ९३१ दलघनफूट पाणीच मिळणार असल्याने आता नाशिककरांना दिवसातून एकदाच पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.
उजनी पाणी; पुर्नविचार याचिका फेटाळली
सोलापूर- पुणेजिल्ह्यात चार धरणांमधून उजनीमध्ये पाणी सोडण्याच्या निर्णयाविरोधात आमदार बाबुराव पाचर्णे यांनी दाखल केलेला पुर्नविचार अर्ज बुधवारी जलसंपत्ती प्राधीकरणाने फेटाळून लावला. प्राधिकरणच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही, यामुळे २६ आॅक्टोबर रोजीच्या निर्णयावर पुर्नविचार करता येणार नाही, असे अध्यक्ष रवी बुद्धीराजा, सदस्या चित्कला झुत्शी यांनी म्हटले.