आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्र्यंबक शाही स्नानास पाणी साेडणार नाहीच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई / नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे २५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या शाही स्नानासाठी नद्या आणि धरणांतून पाणी सोडण्यात येणार नाही, असे राज्य सरकारतर्फे सोमवारी उच्च न्यायालयात सांगण्यात आले. त्यावर तशी हमी राज्य सरकारने मंगळवारी द्यावी, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.
राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना नाशिकच्या कुंभमेळ्यातील शाही स्नानासाठी धरणातून पाणी सोडू नये, या मागणीसाठी औरंगाबादेतील अर्थतज्ज्ञ एच. एम. देसरडा यांनी उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. त्याची सोमवारी न्यायमूर्ती अभय ओक आणि व्ही. एल. अचलिया यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. ‘पाणी सोडण्याबाबत सरकारचे धाेरण ठरलेले आहे. त्यानुसार पिण्यासाठी पाणी पुरवण्याला सरकारचे सर्वाच्च प्राधान्य असले पाहिजे. शाही स्नानासाठी पाणी सोडणे हे चौथ्या आणि सर्वात शेवटच्या प्राधान्यक्रमात समाविष्ट हाेते. त्यामुळे तुम्ही (सरकारने) २५ सप्टेंबरच्या त्र्यंबकेश्वर येथील पर्वणीसाठी पाणी साेडू नये, अशी हमी द्यावी,’ असे निर्देश न्यायालयाने दिले.
त्यावर सरकारी वकील अभिनंदन वाग्यानी म्हणाले, ‘कुंभमेळा हा दर १२ वर्षांनी हाेताे. त्यातील शाही स्नान हा राष्ट्रीय पातळीवरील व धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा साेहळा मानला जाताे. यंदा १८ सप्टेंबर रोजी झालेल्या शाही स्नानासाठी केवळ एक टीएमसी पाणी सोडण्यात आले. २५ सप्टेंबरच्या शाही स्नानासाठी गंगापूर धरणातून पाणी सोडण्यात येणारच नाही.’

वास्तव काय?
पाणी सोडण्याची गरजच नाही

कुंभपर्वात नाशिकमधील तिन्ही शाही स्नान पर्वण्या पार पडलेल्या आहेत. येथे गाेदापात्रात रामकुंडात स्नान होत असल्यामुळे नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. त्र्यंबकेश्वर येथे शाही स्नान कुशावर्त तीर्थात होते. ते कोणत्याही नदीचा भाग नाही. तेथे पाण्याचे जिवंत झरे आहेत. त्यामुळे खरे तर या तीर्थात शाही स्नानासाठी पाणी सोडले जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.