आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दाेन हजार गावांत काेरड, राज्यात भीषण पाणीटंचाई; २,३५८ वाड्यांवरही तीव्र दुर्भिक्ष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सूर्य आग ओकू लागल्यामुळे राज्यातील पाणीसाठे झपाट्याने तळ गाठू लागले आहेत. पावसाळा यायला अजून पंधरा दिवसांचा अवधी असताना राज्यातील १९९८ गावे आणि २,३५८ वाड्यांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणीटंचाईच्या या संकटाचा सामना करण्यासाठी राज्यात २३५८ टँकर सुरू करण्यात आले असले तरी पाणीसाठेच नसल्यामुळे आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार, अशी स्थिती आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी टँकरने पाणीपुरवठा होत असलेल्या खेड्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. २५ मेपर्यंतच्या प्राप्त माहितीनुसार राज्यात सरकारी मालकीच्या ३११ आणि २०४७ खासगी टँकरद्वारे टंचाईचा सामना करत असलेल्या खेड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. गेल्या वर्षी २३२२ टँकरद्वारे ८८४ गावे व २०८१ वाड्यांना पाणीपुरवठा करण्यात आला होता. मराठवाड्यात गेल्या वर्षी २४२ गावे, १६४ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता.

राज्यात साठा २१ टक्के
राज्यामध्ये एकूण २४९८ लघु, मध्यम आणि मोठे सिंचन प्रकल्प तसेच १६ धरणे आहेत. या प्रकल्पांमध्ये एकूण २१ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी तो २५ टक्के आणि २०१३ मध्ये तो २० टक्के होता.

मराठवाड्यात ८ टक्के साठा
मराठवाड्यातील सर्व प्रकारच्या सिंचन प्रकल्पांमध्ये सध्या केवळ ८ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी तो २२ टक्के आणि २०१३ मध्ये केवळ ५ टक्केच होता.

मराठवाड्यातील स्थिती सर्वात गंभीर
मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, नांदेड आणि उस्मानाबादसह जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये पाणीटंचाईचे संकट राज्याच्या अन्य भागांच्या तुलनेत भीषण आहे. उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे आहे ते पाणीसाठे कोरडे पडल्याने ही समस्या आणखीच भीषण बनली आहे.

पाच वर्षांत पाऊस ४० टक्के घटला
मागील पाच वर्षांत राज्यातील पावसाची सरासरी टक्केवारी ४० टक्क्यांनी कमी झाली आहे. २०१०-११ मध्ये राज्यात ११९ टक्के पाऊस पडला होता. मात्र, पाच वर्षांत हे प्रमाण ४० टक्क्यांनी घसरले आहे. २०१४-१५ मध्ये राज्यात केवळ ७० टक्केच पाऊस झाला.

शेतमालाचे उत्पादन आले निम्म्यावर
पाच वर्षांत राज्यातील कृषिमालाचे उत्पादन ५० टक्क्यांनी घटले. खरीप हंगाम बैठकीतील अहवालानुसार, ५ वर्षांपूर्वी तृणधान्य उत्पादन १२३ लाख मे.टन होते. ते २०१४-१५ मध्ये ८३% झाले. कडधान्य उत्पादन ३१ लाख मे.टनांवरून १५ लाख मे.टनांवर आले आहे.

राज्यातील सहा जिल्हे मात्र टँकरमुक्त
मराठवाड्यासह राज्याच्या काही भागात भीषण पाणीटंचाई असली तरीही सिंधुदुर्ग, वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली हे जिल्हे मात्र टँकरमुक्त अाहेत.