आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

175 कोटी खर्चूनही मंत्रालयाला गळती, चौथ्या, सहाव्या मजल्यावर बादल्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पंचतारांकित रुपडे ल्यालेल्या मंत्रालयाच्या नूतनीकरणाचे काम आता पूर्णत्वाकडे आहे. मात्र तब्बल पावणेदोनशे कोटी रुपये खर्च करून जे काम करण्यात आले हे ते निकृष्ट दर्जाचेच झाल्याचा अनुभव येत हे. मंत्रालयाच्या तिस-या, चौथ्या आणि सहाव्या मजल्यावरील पॅसेजमध्ये छतातून पाणी टपकत असल्याने चक्क या पंचतारांकित वास्तूच्या पॅसेजमध्ये बादल्या ठेवाव्या लागत आहेत.
आगीत तीन मजले भस्मसात झाल्यानंतर मंत्रालयाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले. जास्तीत जास्त जागा उपलब्ध व्हावी आणि वास्तूला कॉर्पोरेट रूप यावे म्हणून अत्याधुनिक पद्धतीने बांधकामास सुरुवात झाली. युनिटी कन्स्ट्रक्शनला ११९ कोटी रुपयांना हे नूतनीकरणाचे कंत्राट देण्यात आले. परंतु कामास उशीर झाल्याने ही रक्कम आता १७५ कोटींच्या घरात गेल्याचे समजते. अजूनही मंत्रालयाचे काम पूर्ण झालेले नाही. नवे मुख्यमंत्री आल्यानंतर या कार्यालयाचा मूळ आराखडाच बदलण्यात आल्याची माहितीही सूत्रांनी दिली.

नूतणीकरणानंतर नवीन प्रसाधनगृहे उभारण्यात आली. यामध्ये नळाखाली हात धरल्यास ऑटोमॅटिक पाणी येईल असे नळ बसवण्यात आले होते. परंतु आता ते काढून पुन्हा जुन्याच पद्धतीचे नळ बसवण्यात आलेले आहे. शौचालये तुंबत असल्याने जिन्यांवरून जाताना नाक मुठीत धरून जावे लागत आहे. मंत्रालयातील पोटमाळ्यावरील कँटीनची जागा आरोग्य विभागाला हवी असल्याने आता हे कँटीन खाली नव्याने एका कोप-यात तयार करण्यात येणार आहे. याला एक-दीड महिना लागणार असून मुख्य प्रवेशद्वाराच्या पाय-यांचेही काम बाकी आहे.

हायटेक वास्तूची अशीही ‘शोभा’
मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री एकनाथ खडसे यांची कार्यालये आहेत. पॅसेजमध्ये डक्ट एसी लावण्यात आलेले आहेत. परंतु गेल्या काही दिवसांपासून या एसीमधून पाणी गळत आहे. पाणी पडून टाइल्स खराब होऊ नयेत म्हणून पॅसेजमध्ये चक्क बादल्या ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे या मजल्याची चांगलीच ‘शोभा’ झाली हे. तिस-या आणि चौथ्या मजल्यावरही जवळपास हीच परिस्थिती आहे.