आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवार, आशा भोसलेंच्या पुतळ्यांचे अनावरण, आशाताईंच्या दिलखुलास गप्पा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘शरद पवार कर्करोगासारख्या दुर्धर आजाराशी झुंजत असताना माझी गाणी ऐकत असल्याचे पाहून धन्य वाटले. महागड्या उपचारांनी जे होऊ शकत नाही ते आपल्या स्वरांनी होऊ शकते हे पाहून गायक असल्याचा अभिमान वाटला,’ अशा भावना विख्यात गायिका आशा भोसले यांनी बुधवारी व्यक्त केल्या. शरद पवारांच्या आग्रहावरूनच अापलाही मेणाचा पुतळा बनवण्यात आल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला.

निमित्त होते शरद पवार अाणि अाशा भोसले या दिग्गजांच्या मेणाच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगाचे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमच्या पॅव्हेलियनमध्ये बुधवारी सायंकाळी हा आगळावेगळा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमानंतर पवारांनी माध्यमांशी काहीही राजकीय बोलणे टाळले. केवळ आशाताईंना गाण्याची फर्माईश त्यांनी केली. चंद्र-सूर्य जोवर आहेत तोवर लता-आशा यांचे स्वर राहतील,' अशी भावना पवारांनी व्यक्त केली.

पवार यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती तेव्हा मी त्यांना भेटायला गेले होते. त्या वेळी पवार माझी गाणी ऐकत होते. तुमची गाणी मला धीर देतात, असे त्या वेळी पवार मला म्हणाल्याचे आशाताईंनी सांगितले. पैसा, वस्तू यांनी जे सुख माणसाला मिळत नाही ते तुमचा स्वर देतो, यासारखे दुसरे भाग्य नाही, असे सांगत पवारांनी त्यांच्याबरोबर माझाही पुतळा बनवायचे फर्मान सोडल्यामुळे देशातली मी पुतळाबद्ध झालेली पहिली गायिका बनले आहे, असे आशाताई म्हणाल्या.

या दाेन्ही दिग्गज व्यक्तिमत्त्वांचे मेणाचे पुतळे प्रसिद्ध मूर्तिकार सुनील कंडलूर यांनी बनवले आहेत. कंडलूर यांचे लोणावळ्यात वॅक्स म्युझियम आहे. अाता हे पुतळे लोणावळ्याच्या म्युझियममध्ये कायमचे विराजमान होतील. अाणखीही अनेक दिग्गजांचे पुतळे या संग्रहालयात अाहेत.

पवारांची फर्माईश
आशाताईंना एका गाण्याची फर्माईश झाली, पण त्यांनी ठाम नकार िदला. त्यानंतर तुम्ही गायलेच पाहिजे, असा आग्रह पवारांनी धरताच ‘चांदण्यात िफरताना धरला तू माझा हात’ या गीताचा मुखडा गाऊन आशाताईंनी कार्यक्रमाचा नूरच पालटवून टाकला.

मोह सेल्फीचा
कार्यक्रमास शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, माजी मंत्री जयंत पाटील, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड अशी बरीच दिग्गज मंडळी हजर होती. पुतळ्याचे अनावरण होताच या मंत्र्यांनी पवारांच्या पुतळ्याबरोबर सेल्फी काढली.

माझी उंची कळली
हा पुतळा बनवण्यासाठी माझ्या शरीराची अनेक मोजमापे घेण्यात आली. त्यामुळे पहिल्यांदा मला माझीच उंची कळली या आशाताईंच्या दिलखुलास टिप्पणीला उपस्थितांनी जोरदार दाद दिली.

भुजबळांची पवारांवर मात
पवार हे खरे तर राष्ट्रीय पातळीवरील दिग्गज नेते. छगन भुजबळांचे ते हायकमांडच. मात्र पवारांच्या चार वर्षे अगोदरच महान क्रिकेटपटू कपिलदेवसोबत भुजबळांचा मेणाचा पुतळा बनवण्यात आला. पवारांचा पुतळा बनायला त्यांना चार वर्षे वाट पाहावी लागली.