नागपूर- महाराष्ट्राला पुढील 5 वर्षात कायमस्वरूपी दुष्काळ मुक्त करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून, त्यावर मात करण्यासाठी उपाययोजनांवर तत्काळ काम सुरु केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात दिली. पुढील एका वर्षात किमान 5000 गावांना दुष्काळ मुक्त करण्याबरोबरच दुष्काळ धोरणातही आमूलाग्र बदल करणार असून, यापुढे दुष्काळामध्ये खिरापत वाटणार नाही असेही फडणवीस यांनी सांगितले.
नागपूर हिवाळी अधिवेशनात आज दुष्काळावरील चर्चेदरम्यान फडणवीस विधानसभेत बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, एकेकाळी शेती व शेती आधारित उत्पादनात महाराष्ट्र देशात अग्रेसर होता. मात्र, मागील 10 वर्षापासून राज्याचे शेतीतील उत्पादन तुलनेने घटत आहे. बिमारू राज्ये पुढे जात आहेत. याला महाराष्ट्राच्या पाचवीला पूजलेला दुष्काळ कारणीभूत आहे. यंदा सोयाबीनचे उत्पादनात 58 टक्के, कापसाचे 26 टक्के, मका 53 टक्के, तूर 45 टक्के, मूग व उडीद 75 ते 80 टक्के अशी घट होईल असा अंदाज कृषिविभागाने व्यक्त केला आहे. तसे झाल्यास राज्याचा मागील 10 वर्षांतील खरीप हंगामातील उत्पादनाचा हा निचांक ठरेल. महाराष्ट्रासारख्या प्रगतीशील राज्याला ही न शोभणारी बाब असून, शेती धोरणात आमुलाग्र बदल करण्याच्या दृष्टीने माझे सरकार प्रयत्नशील राहणार आहे. महाराष्ट्राला 2019 पर्यंत कायमस्वरुपी दुष्काळ मुक्त करण्यासाठी महत्वाची पाऊले आम्ही उचलली असून, दुष्काळावर कायमस्वरुपी मात करण्यासाठी उपाययोजनांनावर तत्काळ काम सुरु करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, गेल्या 5 वर्षांच्या कालावधीत दुष्काळी परिस्थिती, पूर, गारपीट यासारख्या नैसर्गिक
आपत्तीच्या घटनांना तोंड द्यावे लागत आहे. या कालावधीत नैसर्गिक आपत्तींसाठी 8377 कोटी रुपये राज्य शासनाने खर्च केले आहेत. परंतु याच काळात राज्य शासनाने फक्त 2692 कोटी रुपये कृषी विकास कामांवर खर्च केले आहेत. यामुळे दुष्काळाचे संकट कायमपणे कमी झाले नाही व दुष्काळाच्या सातत्याची दूष्ट साखळी चालूच आहे. पुरेसा निधी सिंचन व्यवस्था, जलसंधारण, सूक्ष्म सिंचन यावर खर्च न केल्यामुळे दुष्काळाची झळ शेतकऱ्यांना सतत बसत आहे. तसेच मोठया प्रमाणावर सिंचन प्रकल्पांवर खर्च करून सुध्दा सिंचन प्रकल्प अपूर्ण राहिले व सिंचन क्षमता वाढू शकली नाही. राज्यातील 19 हजार 59 गावांची हंगामी पैसेवारी यावर्षी 50 पैशांच्या आत जाहीर झाली आहे. जूनमध्ये फक्त 25 टक्के पाऊस झाल्याने पेरण्या उशीरा झाल्या. नंतर चांगला पाऊस झाला व पेरण्या जरी 102 टक्के झाल्या तरी सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये परतीच्या पावसावेळी कमी पाऊस पडल्यामुळे पिकांची परिस्थिती बिकट आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
संयुक्त राष्ट्र संघटनेच्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय आपत्ती निवारण संस्थेच्या अभ्यासानुसार कोणतीही आपत्ती ही पूर्णत: नैसर्गिक नसते. घटना नैसर्गिक असते आणि त्यामुळे आलेली आपत्ती मानवनिर्मित असते. ती दूर करणे मानवाच्या हाती आहे. हवामानातील बदल आणि जागतिक तापमान वाढीमुळे या सर्व आपत्ती येत आहेत. या आपत्तीमुळे होणारे शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी सिंचनाच्या सुविधांमध्ये वाढ करणे, सुक्ष्म सिंचनावर भर देणे व आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हवामानाचा अचूक अंदाज बांधून त्याप्रमाणे पिकांचे नियोजन करणे आवश्यक झाले आहे. इस्त्रायलसारख्या अनेक देशांमध्ये अशाप्रकारे शेतीचे नियोजन करुन कमी पाऊस पडला तरी दुष्काळ परिस्थिती येऊ न देता शेती यशस्वीपणे केली जाते. त्याचा अभ्यास करून राज्यातील दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी आम्ही उपाययोजनांवर काम सुरु केले असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी सभागृहात दिली.
पुढे वाचा, दुष्काळावर मात करण्याकरीता फडणवीस सरकारने कोणत्या कायम स्वरुपी उपाययोजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे...