मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दुस-या टप्प्याला मुंबईतून प्रारंभ करताना मनसेप्रमुख राज ठाकरेंनी रविवारी पंतप्रधान
नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. ‘मोदी पंतप्रधान झाले तरी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांसारखेच वागतात. अाम्हाला मोदी हे भारताचे पंतप्रधान म्हणून चालतील, पण तुम्ही गुजरातचे पंतप्रधान होणार असाल तर आम्हाला ते अजिबात मान्य नाही,’ असा इशाराच त्यांनी दिला.
प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात राज ठाकरेंच्या भाषणाचा भर विकासाच्या मुद्द्यावर होता. मात्र, मोदी प्रचारात उतरल्यानंतर राज यांनी
आपल्या प्रचाराची दिशा बदलून थेट पंतप्रधानांनाच लक्ष्य केले आहे. भाजपच्या राज्यातल्या नेत्यांवरही त्यांनी तोंडसुख घेतले. रविवारी मुंबईतल्या भांडुपच्या सभेत राज म्हणाले, ‘मी मोदींचा प्रशंसक आहे. मात्र, पंतप्रधान झाल्यानंतर मोदी बदलतील असे वाटले होते. पण अजूनही ते गुजरातच्या बाहेर यायला तयार नाहीत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जर मोदींचे स्वागत "केम छो' अशा शब्दांत करणार असतील तर ते योग्य नाही. कारण गुजराती ही आपली राष्ट्रभाषा नाही. आपल्या पंतप्रधानांची ओळख ही भारताचे पंतप्रधान अशी असायला हवी, गुजरातची नव्हे,’ अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
बाळासाहेबांमुळेच भाजपला बळ
महायुती तुटल्याचा संदर्भ देत राज यांनी भाजपच्या नेत्यांनाही धारेवर धरले. भाजपचे बहुतांश उमेदवार इतर पक्षांतून आयात केलेले अाहेत. तरीही भाजपची स्वबळाची भाषा का? बाळासाहेबांमुळे यांना बळ मिळाले आणि आता हे बेटकुळ्या दाखवू लागलेत, असा जोरदार हल्लाही राज यांनी चढवला.
‘मोदींनी यांनी लोकसभेत तर वापरलेच मात्र आता विधानसभेतही वापरत आहेत. आज मुंडे असते तर मला महाराष्ट्रात यायची गरज पडली नसती असे म्हणत मोदींनीच भाजपच्या राज्यातल्या नेत्यांची लायकी काढली अाहे. प्रत्येक होर्डींगवर मोदींचेच फोटो अाहेत कारण राज्यातल्या नेत्यांकडे पाहून मते मिळणार नाहीत. यांच्या नेत्यांचे मतदारसंघ नाहीत.
काय केले ते पाच वर्षांनी विचारा
नाशिकमध्ये मी काय केले, हा प्रश्न मला वारंवार विचारला जातो. मात्र हा प्रश्न मला आता नाही, पाच वर्षांनंतर विचारा, किंबहुना तो विचारायची गरजच पडणार नाही. नाशकात मला काम करायला मिळू नये यासाठी महापालिका आयुक्तपद हेतुपुरस्सर रिक्त ठेवल्याची टीका करत राज यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले. साधला. चारवेळा फोन करूनही आयुक्तपदाच्या नियुक्तीचे बघतो, असे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिल्याचेही राज ठाकरे म्हणाले.
राज्यात राष्ट्रीय पक्ष हवेतच कशाला ?
स्थानिक पातळीवर राष्ट्रीय पक्षांची गरज काय? अशी भूमिका घेतली आहे. ‘तुमच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात केंद्रात काँग्रेसचे सरकार होतेच ना, तरीही गुजरातचा विकास झाल्याचा जर तुमचा दावा असेल तर मग तुमचे सरकार केंद्रात असताना राज्यात या राज ठाकरेंची सत्ता असेल तर तुम्ही का मदत करणार नाही?’ असा सवालही त्यांनी केला.
अहमदाबाद बुलेट ट्रेन महाराष्ट्राला कशाला?
अहमदाबाद बुलेट ट्रेन कशाला, असा सवाल करत राज यांनी या निर्णयाचीही खिल्ली उडवली. वेगात अहमदाबादला जाऊन काय ढोकळा खायचा का? त्यापेक्षा मुंबईहून चेन्नई, कोलकाता किंवा दिल्लीला बुलेट ट्रेन का सुरू केली नाही, असा सवाल त्यांनी केला. एकीकडे मोदी म्हणतात, मला महाराष्ट्र घडवायचाय आणि गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल इथल्या उद्योजकांना सांगतात, "मुंबई में क्या रखा है, गुजरात चलो.' हे समाजात मतभेद निर्माण करत असल्याची टीका त्यांनी केली.