आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक स्तरावर आपण कमी पडत आहोत - राष्ट्रपती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
के. सी. कॉलेजच्या हीरकमहोत्सवी कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, केंद्र - Divya Marathi
के. सी. कॉलेजच्या हीरकमहोत्सवी कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, केंद्र
मुंबई - प्राचीन काळी आपला देश शैक्षणिक क्षेत्रात वैभवाच्या शिखरावर होता. तक्षशिला, नालंदा ही नावलौकिक असलेली प्राचीन शैक्षणिक विद्यापीठे होती. या विद्यापीठांचा जागतिक शिक्षणावर त्या काळी मोठा प्रभाव होता. परंतु आता जागतिक तुलनेत आपण कमी पडत आहोत. पहिल्या 200 विद्यापीठांत देशातील एकही विद्यापीठ नाही, अशी खंत
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शनिवारी मुंबईत व्यक्त केली.
के. सी. कॉलेजच्या हीरकमहोत्सवी कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन केल्यानंतर राष्ट्रपती म्हणाले, जागतिकीकरणाच्या दिशेने वेगाने झेपावणा-या जगात आपण राहत असून या परिस्थितीशी यशस्वीपणे सुसंवाद साधण्यासाठी भारतीय विद्यार्थ्यांची वैश्विक मानसिकता विकसित करण्याची आवश्यकता असल्याचे सांगत त्यांनी यासाठी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे गरजेचे आहे, असेही म्हटले.
राष्ट्रपती पुढे म्हणाले की, माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञानाचा शैक्षणिक क्षेत्रात चांगला वापर होत असून उच्च शिक्षणासाठी या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पायाभूत सुविधा निर्माण करण्याची आवश्यकता आहे. देशात तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर असून त्याचा जास्तीत जास्त वापर व्हावा.
या वेळी बोलताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, के. सी. महाविद्यालय मुंबईतील एक महत्त्वपूर्ण शैक्षणिक केंद्र असून या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांत नावलौकिक मिळवला आहे. मुख्यमंत्र्यांनी या वेळी राज्य शासनाच्या विविध शैक्षणिक योजनांची माहितीही दिली.
अंबानी नावाचा अभिमान
प्रख्यात उद्योगपती अनिल अंबानी यांनी या वेळी बोलताना सांगितले की, कुडनानी, भंबानी, निचानी, केवलरामानी या सिंधी नावाप्रमाणेच माझे नाव अंबानी असल्यामुळे मला कॉलेजमध्ये सिंधी समजले गेले. माझ्याशी सर्वजण सिंधीमध्ये बोलत असत. माझ्या अंबानी नावाचा मला अभिमान असून भारतीय असल्याचा अभिमान असल्याचेही त्यांनी म्हटले.
शिक्षणामुळे शिस्त लागते : अमिताभ बच्चन
प्रख्यात अभिनेते अमिताभ बच्च्न यांनी आपल्या भाषणात शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना शिक्षणामुळे व्यक्ती फक्त वाचन आणि लेखनच करत नाही तर ती एका मोठ्या समाजाचाही भाग बनते. तसेच तिला शिस्तही लागते. या वेळी राज्यपाल के. शंकरनारायणन, केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा, उच्च् व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे, संस्थेचे अध्यक्ष निरंजन हिरानंदानी आदी उपस्थित होते. राष्ट्रपतींच्या हस्ते या वेळी माजी विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला.