आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • We Want Vidharbha Seprate From Maharashtra Fadanvis

होय, आम्ही विदर्भ वेगळा करणारच- देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला इरादा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- 'होय, भाजपला महाराष्ट्रापासून विदर्भ वेगळा करायचाच आहे. हा आमचा अजेंडा आहे', असा ठाम इरादा भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रापासून विदर्भ वेगळा करण्याची भाजपची गेल्या 20 वर्षांपासून भूमिका असल्याचेही त्यांनी सांगितले. काँग्रेसने आंध्र प्रदेशातून तेलंगणा वेगळा करताना जनतेला अंधारात ठेवले तसे आम्ही करणार नाही. आम्ही सर्वांच्या सहमतीने महाराष्ट्रातून विदर्भ वेगळा करू. कृपा करून याला कोणीही दोन भाऊ वेगळे होत आहेत असा भावनिक रंग देऊ नये, असे आवाहन केले.
एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस यांनी भाजपची आगामी पावले कोणत्या दिशेने पडतील हे स्पष्ट केले. तुम्ही शिवसेनेसोबतची युती तोडली त्यामुळे शिवसेना तुमच्या सोबत नाही. विधानसभा निवडणुकीत जर भाजप बहुमताच्या दिशेने गेला तर तुम्ही वेगळा विदर्भ करणार काय? असा प्रश्‍न त्यांना विचारताच फडणवीस म्हणाले, होय, निश्‍चितच. मोठ्या राज्यांची दोन शकले करून छोटी राज्ये बनवावीत हीच भाजपची विचारसरणी आहे.
गेल्या 20 वर्षांपासून त्यावरच विचार करीत आहोत. छोटी राज्ये निर्माण केली तर त्याचा विकास करता येईल असे आमच्या पक्षाचे मत आहे. याआधी भाजप केंद्रात सत्तेवर असताना आम्ही बिहारचे विभाजन करून झारखंड राज्य बनविले. मध्य प्रदेशातून छत्तीसगड वेगळा काढला आणि हिमाचल प्रदेशाचे विभाजन करून उत्तराखंड हे वेगळे राज्य निर्माण केले याची आठवणही फडणवीस यांनी करून दिली. महाराष्ट्रातून विदर्भ वेगळा काढताना तो शांतपणे कसा काढता येईल याचा आम्ही विचार करीत आहोत, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.