आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम, राज्यात पारा आणखी घसरणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- देशाच्या वायव्य भागात वेस्टर्न डिस्टर्बन्स अर्थात पश्चिमी चक्रावात सक्रिय झाल्यामुळे उत्तर भारतासह महाराष्ट्रातील पारा आणखी घसरण्याची शक्यता आहे. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यातील नाशिक-नगर-पुणे या भौगोलिक पट्ट्यातील तापमान ४ ते ६ अंश सेल्सियस राहील, असे मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. परिणामी रब्बी  पिके आणि फळबागांचे थंडीपासून  संरक्षण करणे आवश्यक असल्याचे मत कृषी  तज्ज्ञांनी व्यक्त केले.
 

या संदर्भात ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ  डॉ. रामचंद्र साबळे यांनी सांगितले, पाकिस्तान, अफगाणिस्तानसह देशाच्या  वायव्य भागात पश्चिमी चक्रावात (वेस्टर्न डिस्टर्बन्स) हा घटक सक्रिय झाला आहे. त्यामुळे या भागातून थंड वारे काश्मीर खोऱ्यासह, हिमालय पर्वतरांगांकडे वाहते अाहे. परिणामी हिमालया पर्वतरांगासह काश्मिरात बर्फवृष्टी होत आहे. हेच वारे भरपूर आर्द्रता घेऊन उत्तर भारतमार्गे राज्यात येते. त्यामुळे उत्तर भारतासह राज्यातील तापमानात मोठ्या प्रमाणात घसरण होईल. देशात जानेवारीचा दुसरा आठवडा चांगल्या थंडीचा राहील.
 
पिकांची काळजी अशी घ्या
तापमान ८ अंशाच्या खाली आल्यास  पिकांची अन्न तयार करण्याची प्रक्रिया मंदावते. पिकांना शक्यतो सायंकाळच्या वेळी पाणी द्यावे, फळबागेत शेकोट्या पेटवाव्यात, यामुळे तापमान एक ते दोन अंशांनी वाढण्यास मदत होते. 
- डॉ. एस.बी. पवार, कृषी विस्तार विद्यावेत्ता, व.ना.मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.

मराठवाड्यालाही  हुडहुडी
मराठवाड्यालाही वेस्टर्न डिस्टर्बन्सचा फटका काही अंशी बसणार आहे. जानेवरी व फेब्रुवारीत नांदेड, परभणी जिल्ह्यात पारा ८ अंशांच्या खाली , तर इतर जिल्ह्यांत तापणान घटण्याची शक्यता डॉ. साबळे यांनी वर्तवली. या काळात केळी पिकावर करपा चा प्रादुर्भाव दिसून येईल. त्याबाबत शेतकऱ्यांनी  काळजी घ्यावी असेही साबळे म्हणाले.

नाशिक-पुणे-नगर गारठणार
डॉ. साबळे यांच्या मते, जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात नाशिकचे तापमान ४ अंशांपर्यत खाली येण्याची शक्यता आहे. याच काळात पुणे आणि नगर जिल्हयातील तापमान ५ ते ६ अंश सेल्सियस राहील ईशान्य व वायव्य दिशेकडून येणारा विंड पाथ (वाऱ्याचा मार्ग) या तीन जिल्ह्यांच्या भागातून जातो . त्यामुळे येथील तापमान इतर जिल्ह्यांपेक्षा लक्षणीय कमी राहील.
 
 
बातम्या आणखी आहेत...