आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Western Railways Head Office Will Be In Mumbai Rail Minister Prabhu

पश्‍चिम रेल्वेचे मुख्यालय मुंबईतच राहणार- रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंची स्पष्टोक्ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- पश्चिम रेल्वेचे मुख्यालय मुंबईतच राहील अशी स्पष्टोक्ती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे. पश्‍चिम रेल्वेचे मुंबईतील चर्चगेट येथे असलेले मुख्यालय अहमदाबादला हलविण्याची मागणी भाजपचे खासदार किरीट सोलंकी यांनी शुक्रवारी लोकसभेत केली होती. त्याविरोधात शिवसेनेने जोरदार आवाज उठवीत हा मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा डाव असल्याचा घणाघात केला होता. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचे पंख छाटण्याच्या या मागणीने मुंबईसह महाराष्ट्रातील जनतेतून संताप व्यक्त झाला होता. त्याची प्रभू यांनी तातडीने दखल घेऊन पश्‍चिम रेल्वेचे मुख्यालय मुंबईतून हलविणार नाही, असे पत्रकच जारी केले आहे.
केंद्रातील मोदी सरकारकडून मुंबईतील महत्त्वाची अनेक केंद्रीय कार्यालये गुजरातला हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्याने शिवसेनेला त्याला विरोध केला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी याला विरोध दाखवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पत्र लिहले होते. मुंबईतील महत्त्वाची कार्यालये इतरत्र हलविण्याची कोणतेही गरज नाही. मुंबईला कमकुवत करण्याचा हा डाव असल्याचे सांगत यात लक्ष्य घालण्यास फडणवीस यांना सेनेने विनंती केली होती.

यापूर्वीही सागरी सुरक्षेसाठी तत्कालीन मनमोहन सिंग यांच्या केंद्रातील सरकारने मुंबईलगत पालघर येथे सागरी सुरक्षा प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याचा प्रकल्प हाती घेतला होता, पण केंद्रात भाजपचे सरकार येताच तो हजारो कोटींचा प्रकल्प गुजरातमधील द्वारका येथे हलविण्यात आला. देशातील पहिली बुलेट ट्रेन मुंबई-पुणे या मार्गावर सुरू करण्याचे सुरुवातीला ठरले होते, पण केंद्रातील नव्या सरकारने त्यात बदल करून बुलेट ट्रेनसाठी मुंबई-अहमदाबाद हा मार्ग निश्‍चित केला आहे. रिझर्व्ह बँकेमुळे मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते त्याच रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय गुजरातला हलवण्याचा प्रयत्न सुरु आहे. याचबरोबर उरण येथील जेएनपीटी बंदरातील लवाहतूक गुजरातच्या कांडला इथे हलवण्याचा प्रयत्न आहे. मात्र, राज्यातील जनतेने याला विरोध केला आहे. शिवसेनेनेही अशा बाबींना वेळोवेळी विरोध केला आहे.

‘मुंबईत अर्धा दिवस ट्रॅफिक जॅममध्येच जातो. मग तुम्ही या शहरात का गुंतवणूक करता? मुंबईत ठेवलंय काय? इथून गुजरात नजीक आहे. चला, गुजरातकडे चला. तुम्ही तिथेच गुंतवणूक करायला हवी!’ असे आवाहन गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी मुंबईत येऊन उद्योगपतींना आणि गुंतवणूकदारांना दोन महिन्यापूर्वीच केले होते. त्यावरून वाद झाला होता. मात्र, आता रेल्वेमंत्री असलेल्या पभूंनी याबाबत पत्रक जारी केल्याने हा वाद शमला आहे.