आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दाभोलकर प्रकरणाचा तपास संपणार तरी कधी? उच्च न्यायालयाने तपास यंत्रणांना पुन्हा फटकारले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी तपास यंत्रणा फक्त चालढकल करून न्यायालयाचा वेळ वाया घालवत आहे. आतापर्यंत तुम्हाला बराच वेळ दिला, मात्र यापुढे वेळ देता येणार नाही,’ अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी सीबीआयची झाडाझडती घेतली. या हत्येचा तपास केव्हापर्यंत चालणार, असा खोचक सवालही न्यायालयाने या वेळी केला. डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या हत्येच्या तपासाबाबतचा अहवाल बुधवारी न्यायालयात सादर करण्यात आला, त्यावर न्यायालयाने असमाधान व्यक्त केले.

डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या हत्या प्रकरणाची सुनावणी न्या. एस.सी. धर्माधिकारी आणि न्या. शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठासमोर सुरू आहे. बुधवारी सीबीआयने दाभोलकरप्रकरणी, तर गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष तपास पथकाने कॉ. पानसरे हत्या प्रकरणाचा सीलबंद तपास अहवाल उच्च न्यायालयात सादर केला. तसेच अजूनही या हत्या प्रकरणात वापरण्यात आलेल्या हत्यारांचा तपासणी अहवाल स्कॉटलंड यार्डकडून प्राप्त झाला नसल्याची माहिती सीबीआयच्या वतीने देण्यात आली. मात्र या माहितीवर आणि सादर अहवालावर असमाधान व्यक्त करत न्यायालयाने अतिरिक्त सॉलिसीटर जनरल अनिल सिंग यांना व्यक्तिश: न्यायालयासमोर हजर राहण्यास सांगितले. त्यानंतर काही काळाने पुन्हा या सुनावणीला सुरुवात झाली असता न्यायालयाने सीबीआयला चांगलेच फटकारले. हा खटला फक्त एका कुटुंबापुरता मर्यादित नसून संपूर्ण समाजाशी ही बाब निगडित असल्याचे मत न्यायालयाने या वेळी व्यक्त केले. या हत्यांचा तपास करण्यात यंत्रणांना का वेळ लागत आहे, कोणत्या तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे, याविषयी अॅड. सिंग यांनी न्यायालयाला माहिती दिली. यापूर्वी चार ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान दाभोलकर हत्याप्रकरणी आणखी एका आरोपीला अटक करणार असल्याची माहिती सीबीआयने दिली होती. त्या वेळी ‘फक्त अटक करणार हे सांगू नका, आठ दिवसांत अटक करून लवकरात लवकर तपास पूर्ण करा,’ अशा शब्दांत न्यायालयाने फटकारले हाेते. आता पुढील सुनावणी १६ डिसेंबरला होणार आहे.

"अाता अधिक वाट पाहता येणार नाही'
पानसरे हत्या प्रकरणात विशेष तपास पथकाचे वकील अॅड. देशमुख यांनी येत्या आठवडाभरात या प्रकरणात मोठी घडामोड घडणार असल्याची माहिती न्यायालयासमोर दिली. त्यावरही न्यायालयाने संताप व्यक्त केला. ‘आपण अधिक वाट पाहू शकत नाही. तपास यंत्रणा गंभीर नाहीत असे चित्र निर्माण होऊ नये याची काळजी घ्या,’ असेही न्यायालयाने सुनावले.
बातम्या आणखी आहेत...