मुंबई- अभिनेता संजय दत्तने अशी कोणती कामे केली की, ज्यामुळे त्याची लवकर सुटका करण्यात आली, अशी विचारणा उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडे सोमवारी केली. त्यावर संजय दत्तच्या शिक्षेबाबत सरकारकडून कोणत्याही नियमांचे उल्लंघन झाले नाही. चांगल्या वर्तणुकीमुळेच त्याची शिक्षा कमी करण्यात आली, असे स्पष्टीकरण राज्य सरकारने दिले. दरम्यान, याप्रकरणी दोन आठवड्यानंतर सुनावणी होणार आहे.
सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भालेकर यांनी संजय दत्तच्या लवकर सुटकेविरोधात याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने याबाबत सरकारकडे विचारणा केली. त्यावर स्पष्टीकरण देताना राज्य सरकारने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले. संजय दत्तने दिलेली कामे वेळेत पूर्ण केली आणि त्याची तुरुंगातील वर्तणूक चांगली असल्यामुळे त्याची सुटका करण्यात आली आहे. यामध्ये कोणत्याही नियमांचे उल्लंघन झालेले नाही.
आठ महिने आधी सोडले
संजय दत्तला शिक्षा पूर्ण व्हायच्या आठ महिने आधी का सोडले? तो अनेकदा पॅरोलवर बाहेर होता मग त्याची चांगली वर्तणूक पोलिसांना कशी समजली? महाराष्ट्र कारागृह विभागासोबत संजय दत्तच्या सुटकेसंदर्भात चर्चा झाली होती का? असे प्रश्न न्यायालयाने सरकारला केले. त्यावर राज्य सरकारने आपली बाजू मांडली.